नवी मुंबई : महानगरपालिकेच्या नेरूळ सेक्टर 8 मधील कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यान व छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यानामध्ये पुर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे शुक्रवारी (दि. 11 डिसेंबर) केली आहे.
महापालिका प्रभाग 87 मध्ये नेरूळ सेक्टर 8 व 10 या परिसराचा समावेश होत आहे. नेरूळ सेक्टर 8 मध्ये कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यान व छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान ही महापालिकेची दोन उद्याने आहेत. या उद्यानामध्ये सुरक्षारक्षक नसल्याने परिसरात समस्या निर्माण झाल्या असून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. रात्री या दोन्ही उद्यानात मद्यपि लोकांच्या पार्ट्या मोठ्या प्रमाणावर होत असून गर्दुलेही नशापाणी करताना दिसतात. उद्याने वेळेवर बंद होत नसल्याने मद्यपिंच्या पार्ट्या व गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने दिवसाही अनेक समस्या निर्माण होत आहेत. उद्यान वेळेवर बंद करणे आणि सुरक्षारक्षक सतत उपलब्ध करून देणे यासाठी आपणास हे निवेदन सादर करत आहे. दोन्ही उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने परिस्थिती गंभीर झालेली आहे. उद्यानात आपण दरवर्षी लाखो रूपये खर्च करत आहोत. पण महापालिकेची ही मालमत्ता सुरक्षारक्षक नसल्याने व रात्रीही उद्याने बंद होत नसल्याने उद्याने बेवारस असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण उद्यानात सुरक्षारक्षक उपलब्ध करून देण्याचे व रात्रीच्या वेळी उद्याने वेळेवर बंद करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.