स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ –Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मालमत्ताकर थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत १५ डिसेंबर २०२० पासून १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दोन महिन्यांच्या कालावधीकरीता ‘मालमत्ताकर अभय योजना २०२०-२१’ लागू करण्याचा जनहिताय निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे.
कोव्हीड काळातील लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तसेच नागरिकांकडून कररूपाने जमा होणाऱ्या निधीतूनच महानगरपालिकेच्या वतीने विविध सेवासुविधांची पूर्ती केली जात असून महानगरपालिकेच्या मुख्य महसूल स्त्रोत असलेल्या मालमत्ताकराची वसूलीही कमी झालेली आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन नागरिकांना आर्थिक दिलासा देणारी व कररूपाने जमा होणाऱ्या निधीतून दर्जेदार सुविधापूर्ती करण्याच्या दृष्टीकोनातून २ महिन्यांच्या कालावधीकरिता अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे.
याद्वारे मालमत्ताकर थकबाकी असलेल्या नागरिकांनी आपल्या मालमत्ताकराची थकीत रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांना ७५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक रक्कमेवर सूट मिळणार आहे. या अभय योजनेस कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसून मालमत्ताकराची रक्कम व ७५ टक्के सवलत वगळून उर्वरित २५ टक्के दंडात्मक रक्कम एकाचवेळी भरावयाची आहे. टप्प्याटप्प्याने भरणा केलेल्या रक्कमेस अभय योजना लागू राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी १५ फेब्रुवारीची वाट न पाहता अभय योजना लागू झाल्यापासून पहिल्या पंधरवड्यातच ३१ डिसेंबरपर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अभय योजना सुरू होण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमांना अभय योजना लागू राहणार नाही याची नागरिकांनी विशेष नोंद घ्यावयाची असून अभय योजना सुरु होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमेच्या परताव्यासाठी अभय योजनेअंतर्गत दावा करता येणार नाही. या मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर तसेच सर्व ८ विभाग कार्यालये आणि सर्व भरणा केंद्रांवर अर्ज उपलब्ध असणार आहे. अभय योजनेअंतर्गत महापालिका मुख्यालय, सर्व ८ विभाग कार्यालये तसेच सर्व भरणा केंद्रे या ठिकाणी रोख / धनादेश / धनाकर्ष याव्दारे रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी दिलेले धनादेश अभय योजनेच्या कालवधीमध्ये न वटल्यास अर्जदारास अभय योजनेचा लाभ मिळणार नाही. रोखीने रक्कम भरतना भारतीय रिझर्व्ह बँकेचे या संदर्भातील नियम लागू असतील. याशिवाय महानगरपालिकेच्या http://www.nmmc.gov.in या वेबसाईटवर तसेच NMMC e-connect या मोबाईल ॲपवर अभय योजनेची विशेष लिंक दिली जाणार असून त्याठिकाणी ऑनलाईन पध्दतीने डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकींग / एनईएफटी / आरटीजीएस याव्दारेही कराचा भरणा नागरिकांना करता येईल.
१५ डिसेंबरपासून ही अभय योजना नागरिकांसाठी लागू होत असून यामध्ये ऑनलाईन प्रणाली राबविली जात असल्याने या संगणकीय प्रणालीच्या सर्व तांत्रिक बाबींची खात्री अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी करून घेतली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ताकर थकबाकीदारांना कोव्हीडच्या काळात दिलासा देणाऱ्या या अभय योजनेचा लाभ घेऊन या करांतूनच नागरी सेवासुविधांची पूर्तता केली जात असल्याने थकबाकीदार नागरिकांनी आपल्या नवी मुंबई शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.