
नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बस क्रं ४ आणि ८चा मार्ग पूर्ववत करण्याची लेखी मागणी समाजसेविका व प्रभाग ४२ मधील भाजपाच्या सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे शनिवारी (दि. १९ डिसेंबर) केली आहे.
कोरोना काळात महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या काही बसचे मार्ग बदलण्यात आले होते. त्यामध्ये बस क्रमांक ४ आणि ८चाही समावेश आहे. बस क्रमांक ४ ही वाशी सेक्टर ६ येथून सुरू होते व तिचा अंतिम थांबा ठाणे रेल्वे स्टेशननजिकचा सिडको बसथांबा आहे. बस क्रमांक ८ ही वाशी रेल्वे स्टेशनवरून सुरू होते व तिचा अंतिम थांबा थांबा ठाणे रेल्वे स्टेशननजिकचा सिडको बसथांबा आहे. कोरोना सुरू होण्यापूर्वी कोपरखराणे परिसरातील अंर्तगत भागातील मोठ्या प्रमाणावर निवासी लोकवस्ती असलेल्या सेक्टर २२ व २३ या परिसरातून बस क्रं ४ व ८ जात असे. कोपरखैराणेवासियांना थेट घराजवळ या परिवहन उपक्रमाच्या बससेवेचा लाभ होत असे आणि परिवहनलाही तिकिटीतून उत्पन्न प्राप्त होत असे. परंतु कोरोना सुरू झाल्यानंतर बस क्रं ४ व ८ या बससेवेचा खेळखंडोबा सुरू झाल्याने सेक्टर २२ व २३ मधील रहीवाशांचे बससुविधेबाबत हाल सुरू झाले आहेत. काही बसेस आत येत असल्या तरी अधिकांश बस सेक्टर २२-२३ कडे येण्यासाठी वळसा मारून आत येण्याऐवजी डी मार्ट समोरील मुख्य रस्त्यावरून गुलाब सन्स डेअरी, तीन टाकी या मार्गे थेट ठाण्याला जातात. तीच परिस्थिती ठाण्याहून येणाऱ्या बसेसबाबतचीही आहे. ‘आम्ही आतमध्ये जात नाही, परवानगी नाही’ अशी उत्तरे वाहकांकडून कोपरखैराणे सेक्टर २२ व २३ मधील रहीवाशांना दिली जातात. काही बसेसना परवानगी व काही बसेसना परवानगी नाही, हा नेमका काय प्रकार आहे? बस क्रं ४ व ८ चे चालक-वाहक सेक्टर २२ व २३ मध्ये बसेस आणण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ करतात. त्या वाहक व चालकांच्या कामचुकारमुळे सेक्टर २२ व २३च्या रहीवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासाची गैरसोय होत आहे. लवकर बस न आल्यास त्यांना १५ ते२० मिनिटाची पायपीट करत बस पकडण्यासाठी मुख्य रस्त्यावर यावे लागते. तरी आपण या समस्येचे गांभीर्य जाणून घेवून कोपरखैराणे सेक्टर २२ व २३ मधील नागरिकांचे प्रवासाबाबत होत असलेली फरफट लक्षात घेता परिवहन उपक्रमातील संबंधित अधिकाऱ्यांना बस क्रं ४ व ८च्या सर्वच बसेसना पूर्वीप्रमाणेच कोपरखैराणे सेक्टर २२ व २३ मधून जाण्याचे निर्देश द्यावेत. या प्रकारामुळे लोक त्रस्त झाले आहेत. एकीकडे परिवहन उपक्रमाचे प्रवासी उत्पन्न कमी होत असताना बस वाहक व चालकांच्या आडमुठेपणामुळे उत्पन्नात घट व सेक्टर २२ व २३च्या रहीवाशांना सहन करावा लागणारा मानसिक त्रास या बाबी पाहता आपण लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी समाजसेविका सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.