
संदीप खांडगेपाटील : 8369924646 -9820096573
नवी मुंबई : भाजपाचे दोन आमदार, अर्धशतकाच्या जवळपास असलेले माजी नगरसेवकांचे पाठबळ तरीही नवी मुंबई शहरात भाजपाला मुख्यालय नाही. वाशीतील इमारत पाडून झाली, आता पुर्नबांधणीला सुरूवात करणार कधी? असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्याकडून विचारला जात आहे.
वाशी मॉडर्न कॉलेजपासून अंर्तगत रस्त्यावरून पुढे गेल्यावर नवी मुंबई भाजपाच्या मुख्यालयाची जागा पहावयास मिळते. मुख्यालयासाठी इमारत पुर्ण पाडून झाली असून जिल्हा मुख्यालयाच्या कामाला अजून गती न मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यामध्ये कुजबुज सुरू झालेली आहे. दोन आमदार व अर्धशतकीय माजी नगरसेवकांचे पाठबळ असतानाही भाजपाच्या जिल्हा मुख्यालय बांधकामाला नेमकी अडचण काय आहे? मुख्यालयाच्या पुर्नबांधणीबाबत महापालिका प्रशासनाकडे परव्ाानगीसाठी कागदपत्रे दाखल करण्यास विलंब का होत आहे? याबाबत भाजपा कार्यकर्त्यामध्ये आता चर्चा सुरू झाली असून लवकरच या चर्चेचे पडसाद आता खाडीपलिकडे असलेल्या भाजपाच्या चर्चगेट येथील मंत्रालयानजीक योगक्षेम ईमारतीच्यासमोरील प्रदेश मुख्यालयातही उमटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
1972-73 साली नवी मुंबई भाजपाकडून जिल्हा मुख्यालयासाठी प्रदेश भाजपाकडून ही नवी मुंबई जिल्हा मुख्यालयासाठी जागा विकत घेतली असून या जागेचे कागदही भाजपच्याच नावाने आहेत. मुंबई महापालिकेत भाजपा नगरसेवकांचे महिन्याचे मानधन (वेतन) हे थेट भाजपा कार्यालयात जमा होत असून त्यातूनच कार्यालयीन खर्च, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन आदी भागविले जात आहे. मात्र मुंबईलगतच असलेल्या नवी मुंबई महापालिकेतील भाजपा नगरसेवकांनी आपले मानधन (वेतन) नवी मुंबई भाजपा कार्यालयासाठी जमा करण्याचे आजतागायत स्वारस्य दाखविलेले नाही. याबाबत मधल्या काळात केवळ चर्चा झाली, मात्र आजतागायत कोणत्याही नगरसेवकाने आपले वेतन जिल्हा भाजपा कार्यालयासाठी जमा केलेले नाही.
नवी मुंबई जिल्हा भाजपा कार्यालयाचे बांधकाम निकृष्ठ झाल्याचे सांगत इमारत पाडण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे जे.पी. नड्डा यांनी 20 जानेवारी 2020 रोजी हाती घेतली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश भाजपाची कार्यकारिणी ठरविण्यात आली. त्यावेळी फेब्रुबारी महिन्यात नड्डा हे महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी 16 फेब्रुवारी 2020 रोजी नड्डा यांच्या हस्ते भाजपाच्या नवी मुंबई कार्यालयाचे भुमीपुजन करण्यात आले. या घटनेला 11 महिन्याचा कालावधी लोटला तरी पक्षाच्या नवी मुंबईच्या कार्यालयाच्या कामकाजात फारशी गती आलेली नाही. कोरोना काळामुळे मार्चपासून अडथळे आले असले तरी आता राज्यात सर्वच ठिकाणी बांधकामाला गेल्या दोन-तीन महिन्यापासून गती आलेली असताना नवी मुंबई भाजपाच्या वाशीतील कार्यालयाच्या कामास आजही अडथळ्याची मालिका का पार पाडावी लागत आहे. पुर्नबांधणीच्या परवानगी कामासाठी महापालिका प्रशासनाकडे अजूनही कागदपत्रे भाजपा नवी मुंबईकडून सादर केली नसल्याचे कार्यकर्त्याकडून सांगण्यात येत आहे.
महापालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहिर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जय्यत तयारी सुरू झालेली असतानाच भाजपा संघटनात्मक पातळीवर ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघात परस्परविरोधी भास पहावयास मिळत आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघात भाजपा संघटनेची सहा मंडळे असून यात नेरूळ (पूर्व), नेरूळ (पश्चिम), बेलापुर, सानपाडा या मंडळामध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. वाशी व तुर्भे मंडळामध्ये हे वर्ग अजून आयोजित करण्यात आलेले नाही. या वर्गामध्ये 10 विषयांचा समावेश होत आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून एकही कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आलेले नाही. एकीकडे महाविकास आघाडीचा धसका घेवून भाजपाच्या पाचव्या सभागृहातील नगरसेवकांमध्ये महाविकास आघाडीचे आकर्षण वाढीस लागले आहे. गोपनीय बैठकांनाही सुरूवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई भाजपा कार्यालयाचे रखडलेले काम, प्रशिक्षण वर्गा आयोजण्यातील उदासिनता, मुंबईचे नगरसेवक पक्ष कार्यालयाला मानधन जमा करतात तर मग नवी मुंबईचे नगरसेवक पक्ष कार्यालयासाठी मानधन जमा करण्यास टाळाटाळ का करतात असा कार्यकर्त्याकडून उघडपणे विचारला जाणारा प्रश्न या पार्श्वभूमीवर महापालिका सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आलबेल नसल्याचे निर्माण झालेले चित्र महाविकास आघाडीमध्ये उत्साह निर्माण करण्यास हातभार लावणारे आहे.