संदीप खांडगेपाटील : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपाचा झालेला पराभव बॅलट पेपरमधील गडबडीमुळे झाल्याची शंका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. त्यांची ही शंका एका अर्थाने ईव्हीएममधील गडबडीला दुजोरा देणारीच असून ईव्हीएमने मतदान झाले तरच भाजपा विजयी होऊ शकतो असा आहे. रावणाचा प्राण जसा त्याच्या नाभीत होता तसाच भाजपाच्या यशाचा आत्मा हा ईव्हीएममध्ये आहे. म्हणूनच त्यांचा बॅलटपेपरवर विश्वास दिसत नाही, असे सणसणीत उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
यासंदर्भात सावंत म्हणाले की, विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पदवीधर व शिक्षकांनी खरे मतदान करून भाजपाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. हा वर्गही आता भाजपापासून दुरावला असून मोदी सरकार व त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळला आहे. मोदींच्या राज्यात अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन हवेतच विरले उलट १२ कोटी रोजगार मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे गेले. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. इतकेच काय मोदींनी त्यांच्या न्हाव्यालाही यावर्षी रोजगार दिला नाही. देशाला अधोगतीला लावले असून मोदींबद्दल तोच आक्रोश या निवडणुकीतून दिसून आलेला आहे.
मोदींच्या ‘मन की बात’लाही आता मोठ्या प्रमाणात डिसलाईक केले जात आहे. सोशल मीडियातून त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर ट्रोल केले जात आहे. यातून त्यांच्याबद्दलची प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे ही वस्तुस्थिती आहे. ईव्हीएमवर विरोधकांकडून वारंवार शंका घेतल्या जात आहेत त्या रास्त असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर खरे मतदान दिसेल आणि त्यात भारतीय जनता पक्षाचा पराभवच नाही तर तो पक्ष नेस्तनाबूत होईल, असे सावंत म्हणाले.