संदीप खांडगेपाटील : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सुट न दिल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. २८ डिसेंबर) धडक मोर्चाचा दणका देत आयआरबी टोलनाका प्रशासनाला वठणीवर आणले. या दणक्याने टोलनाका प्रशासनाने ०१ जानेवारी २०२१ पासून टोलमध्ये सुट देण्याचे आश्वासन दिले आहे.
पनवेल तालुक्यातील किरवली येथे असलेल्या शिळफाटा टोलनाक्यातून स्थानिक ट्रान्स्पोर्टच्या छोट्या मोठ्या वाहनांना सूट दिली जात नसल्याने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवार, २८) किरवली(रोहींजण) टोलनाका प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाची तीव्रता पाहून पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात होता. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालीला धडक मोर्चाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व आंदोलकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून आभार व्यक्त केले.
या आंदोलनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक हरीश केणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चाहुशेठ पाटील, गोपीनाथ पाटील, विनोद पाटील, रोहिदास पाटील, मोतीलाल कोळी, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या सुरुवातीस ज्येष्ठ कार्यकर्ते हरी फडके यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी यावेळी बोलताना म्हंटले की, स्थानिक भूमिपुत्र म्हणून आंदोलन आपल्याला नवीन नाही. सिडको, एमआयडीसी, कॉरिडोर अशा विरोधात अनेक आंदोलने आपण केली आहेत. भूमिपुत्र म्हणून स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे हि भूमिका कायम राहिली आहे. जमिनी प्रकल्पांना संपादित झाल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तो सोडविण्यासाठी छोटे मोठे उद्योगधंदे केले जातात. त्याचप्रमाणे येथील स्थानिकांनी टेम्पोच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत आहे, असे असताना स्थानिक म्हणून त्यांना टोलमध्ये सूट देणे क्रमप्राप्त असूनही ती सवलत दिली जात नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले असल्याचे नमूद केले.
यावेळी नगरसेवक हरिष केणी यांनी बोलताना सांगितले की, टोलनाका किरवलीत पण या टोलनाक्याला शिळफाटा नाव दिले गेले आहे, हे चुकीचे नाव असून या टोलनाक्याला किरवली नाव देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या टोलनाक्यात स्थानिकांना सूट मिळत नाही हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. आमदार प्रशांत ठाकूर हे धडाडीचे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने यशस्वी झाले आहेत, त्यामुळे हे आंदोलनही यशस्वी होणारच असा दृढ विश्वास केणी यांनी व्यक्त करून मागण्या पूर्ण न केल्यास टोलनाका पूर्ण बंद करू, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
या दरम्यान आयआरबी टोलनाका प्रशासनाकडून चर्चेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाना आमंत्रित करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत टोल नाक्यावरून रोहींजण परिसरातील स्थानिक चालक मालक नोंदणीकृत संघटनेच्या सभासदांची माल वाहतूक वाहने विनाशुल्क वाहतूक करीत होती. परंतु सध्या संस्थेच्या वाहनांना टोल आकारले जात असल्याने त्यांना टोलमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या चर्चेदरम्यान केली अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचेही नमूद केले. यावेळी प्रशासनाने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या वाहनांना ०१ जानेवारी २०२१ पासून टोलमध्ये सूट देण्याचे मान्य केले. तसेच यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात विषय मांडून त्यांना कमी पगारावर काम करावे लागत असल्याने त्यांना किमान वेतन १५ हजार रुपये पगार द्यावा, अशी मागणी यावेळी केली आहे.
या महामार्गाला सर्व्हिस रोड नसल्याने साहजिकच स्थानिकांना याच मार्गावरून वाहतूक करावे लागते. येत्या काळात या मार्गाचे रुंदीकरण होऊन सर्व्हीस रोड मिळेल पण तो पर्यंत याच मार्गाचा उपयोग केला जाणार त्यामुळे स्थानिकांच्या वाहतूक वाहनांना सूट प्राधान्याने मिळाली पाहिजे. आयआरबी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत टोल सूटचा प्रश्न मार्गी लागला आहे, त्यानुसार स्थानिकांच्या माल वाहतूक वाहनांना सूट मिळणार आहे. मात्र प्रशासनाने माघार घेतल्यास तीव्र आंदोलन करू. या टोल नाक्यावरील कमर्चाऱ्यांना किमान वेतन लागू करावा ही मागणी केली आहे. आरबीआय या बाबतीत सहकार्य करतील अशी अपेक्षा असल्याचे आमदार प्रशांत ठाकुर यांनी यावेळी सांगितले.