संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त सानपाडा प्रभाग ७६ मध्ये संततधार वरूण राजाच्या उपस्थितीत भाविकांनी आषाढी वारी उत्साहात काढली. या वारीमध्ये बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यत सर्वच उत्साहात सहभागी झाले होते.
सानपाडा प्रभाग ७६ मध्ये मंगळवार, दि. २० जुलै रोजी साईभक्त महिला फांऊडेशनच्या वतीने भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आषाढी वारीला येताय ना’ या अभियानांतर्गत आषाढी वारीचे आयोजन केले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही भाविकांना, वारकऱ्यांना विठू रायाचे पंढरीला जावून दर्शन घेता आले नाही. तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्याही दिंडीत सहभागी होता आले नाही. त्यामुळे भाविकांची विठू दर्शनाची आस, वारीची परंपरा सानपाड्यातच प्रातिनिधिक स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सिंगचे भान राखत साई भक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी या वारीचे नियोजन केले होते. समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेली ही आषाढी वारी अभंगाच्या गजरात पार पडल्याचे समाधान स्थानिक रहीवाशांनी व्यक्त केले.
सानपाडा प्रभाग ७६ मध्ये साईभक्त महिला फाउंडेशन यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त दिंडीचे नियोजन करण्यात आले होते. या दिडींत सेक्टर २ ३ ४ व ८ या सेक्टरमधून सोशल डिस्टन्स चे पालन करून, टाळ मृदंग च्या गजरात, वारकऱ्यांच्या पताका घेऊन, महिला, लहान मुले, भाविक मोठ्या संख्येने तुळशी वृंदावन घेऊन, कलश घेऊन, बालक पारंपारिक वेशभूषा करून दिडींत सहभागी झाले होते. दिडींमध्ये विठ्ठल रखुमाई, तुकोबा माऊली, वासुदेव आदी प्रतिकात्मक रूपात सहभागी झाल्याचे चित्रही यावेळी दिडींदरम्यान निर्माण झाले. दिडींत महिलांनी फुगड्या खेळत दिडींतील पारंपारिकता जोपासण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, साईभक्त महिला फांऊडेशनच्या सदस्या, स्थानिक रहीवाशी, पोलीस अधिकारीही दिडींत विठू माऊलींच्या दर्शनासाठी सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.
ओपीजी टॉवरसमोरून सकाळी ११ वाजता ही दिंडी निघालेली या दिडींची सानपाडा पोलीस स्टेशनमागील गणेश मंदिराजवळ सांगता झाली. त्याच ठिकाणी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना फराळ म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले. दिडींमुळे संपूर्ण प्रभाग सांप्रदायिक विठुरायाच्या जयघोषात भक्तिसागरात रममाण झाला व सानपाड्यात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीचा महापुर ओंसडून वाहिलेला स्थानिक रहीवाशांना सहभागातून पाहता आला. या दिंडी सोहळ्याच्या आयोजनाचा हेतू मुसळधार पाऊस असतानाही भाविकांच्या सहभागामुळे यशस्वी झाला असल्याची माहिती आयोजक व साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी दिली.