संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : कौंटूबिक कलहातून नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे फरार असतानाच महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पोलिसांनी लेखी निर्देश दिल्याने फरार गजानन काळेंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. कालच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या महिला रणरागिनींकडून फरार गजानन काळेंना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्यापाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी गजानन काळेंच्या अटकेसाठी पोलिसांकडे विचारणा केल्याने नवी मुंबई पोलिसांच्या पर्यायाने नेरूळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.
गजानन काळे यांच्या पत्नी सौ. संजीवनी काळे यांनी नेरूळ पोलिस ठाण्यात गजानन काळे यांच्याविरोधात कौंटूबिक हिंसाचार व जातीवाचक शब्दप्रयोग यासह अन्य उल्लेख करत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून नेरूळ पोलिस ठाण्यात गजानन काळेंविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी गजानन काळेचा शोध घेण्यात नेरूळ पोलिसांना यश आलेले नाही. त्यातच प्रसिध्दी माध्यमांसमोर बोलताना सौ. संजीवनी काळे यांनी उत्पन्नाचे स्त्रोत, मालमत्ता, मनपा अधिकाऱ्यांचे आर्थिक सहकार्य , तसेच काळेंच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांचा जमाप्रकरणात करण्यात आलेला नामोल्लेख केल्यामुळे गजानन काळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. नवी मुंबई शहरातील महिला वर्गाचाही सौ. संजीवनी काळेंना पाठिंबा वाढू लागला आहे. त्यातच सौ. संजीवनी काळे यांच्याकडून गंभीर स्वरूपातील माहिती सादर केली जात असतानाही नेरूळ पोलिसांना गजानन काळेंचा ठावठिकाणा न लागणे याबाबत आता उघडपणे उलटसूलट चर्चा होवू लागली आहे.
राज्याचे गृहमंत्री वळसेपाटील व विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची गजानन काळेंच्या अटकेबाबतची भूमिका, महिला रणरागिनींचा आक्रमक पावित्रा, सौ. संजीवनी काळेंकडून प्रसिध्दी माध्यमांना देण्यात आलेली धक्कादायक माहिती, उत्पन्नाचे स्त्रोत, मालमत्ता, मनपा अधिकाऱ्यांचे आर्थिक सहकार्य , तसेच काळेंच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांचा जमाप्रकरणात करण्यात आलेला नामोल्लेख, यासह तक्रारीत कौंटूबिक हिंसाचार व जातीवाचक शब्दप्रयोग असे असतानाही गजानन काळे पोलिसांना अद्यापि न सापडणे यामुळे नवी मुंबईचे राजकारण ढवळून निघाले आहे. गजानन काळे समोर आल्यास अनेक घटनांचा खुलासा होणे शक्य असला तरी सध्या नाण्याच्या एकाच बाजूमुळे राजकीय क्षेत्रात जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे. संजीवनी काळेंना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील महिलांचाही सहभाग वाढत चालल्याने मनपा निवडणूकीला मनसे कसे सामोरे जाणार व मनसेसुप्रिमो राज ठाकरे काय भूमिका घेणार याचीही उत्सूकता वाढीस लागली आहे. गजानन काळेंना पकडणे आता नेरुळ पोलिसांच्या कार्यक्षमतेला आव्हान देणारा विषय बनला असून मंत्रालयीन पातळीवरही गजानन काळेप्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.
ना. रामदास आठवलेंना सौ. संजीवनी काळेंचे साकडे
घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे आणि त्यांच्या परिवाराने मंगळवारी रामदास आठवले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते.
गजानन काळे लवकरच ताब्यात येतील
गेल्या सहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला.