शालेय समस्यांबाबत एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
नवी मुंबई / ठाणे : कोरोना महामारीबाबत शालेय फीबाबत बुलढाणा जिल्ह्यासारखी माफी मिळावी तसेच फी वरून पालक-विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या मुजोर शाळांवर कारवाई याबाबत आठ दिवसात निर्णय न घेतला गेल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच आमरण उपोषण, अन्नत्याग तसेच बैठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रक काढून जिल्हाभरातील शाळांतील विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचे आदेश दिले होते. तसेच आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील शाळांसाठी काढून मुलांना फी माफी द्यावी, वज्रेश्वरीतील डीव्हाईन ग्रेस, कल्याणमधील आर्य गुरूकुल, भिवंडीतील दि स्कॉलर या मुजोर शाळांची चौकशी करून त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी, ज्या शाळा विद्यार्थ्यांकडून दडपशाहीने अकारण फी वसुली करत आहेत, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, आरटीईमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रवेशांना आडकाठी करण्यात येत आहे अशा तक्रारी असणाऱ्या सर्वच शाळांची चौकशी करून त्या शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वज्रेश्वरीतील डीव्हाईन ग्रेस, कल्याणमधील आर्य गुरूकुल, भिवंडीतील दि स्कॉलर या तीन शाळांकडून फी, दाखला, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करणे, आरटीईचे प्रवेश नाकारणे यासह अन्य स्वरूपात पालकांसह विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्रास देण्यात आला आहे याचा हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात विस्तृतपणे पाढाच वाचला आहे. आपल्या मागण्यांवर व मुजोर शाळांवरील कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ८ दिवसाच्या आत निर्णय न घेतल्यास आपण त्यांच्याच दालनात लोकशाही पध्दतीने आमरण उपोषण, अन्नत्याग तसेच बैठे आंदोलन करणार असल्याचा इशारा हाजी शाहनवाझ खान यांनी दिला आहे.