नवी मुंबई :परिवहन उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कामगारांसमवेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर व परिवहन व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांची भेट घेत समस्या सोडविण्याची मागणी केली.
महापालिका परिवहन उपक्रमात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या समस्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही या समस्यांचे निवारण होत नाही. या समस्या प्रलंबितच आहे. सुविधांसाठी आग्र्रही असणे हा कामगारांचा हक्क असून न्यायालयानेही ते मान्य केलेले आहे. परिवहनचे कामगार त्यांच्या समस्या निवारणासाठी सातत्याने आमच्या कामगार संघटनेच्या कार्यालयात येत आहे. आपण या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांना समस्या निवारणासाठी आदेश देण्याची मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी केली आहे.
१ ) २०१५ पासूनचा ३३ महिन्याचा एरियस देण्यात यावा. प्रशासनातील अन्य कामगारांना हा एरियस मिळालेला आहे. तथापि परिवहनच्या कर्मचाऱ्यांना यापासून का वंचित ठेवण्यात आले आहे, तेच समजत नाही. प्र्रशासनाने त्यांना तातडीने एरियस उपलब्ध करून द्यावा.
२ ) कामगारांना माहे जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२१ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्याच्या फरकाची रक्कम देण्यात यावी.
३ ) १/७/२०२१ रोजीपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्यात ४५५ रुपये वाढ झाली आहे, ती देण्यात यावी.
४ ) परिवहन विभागातील सफाई कामगारांना कोविड भत्ता देण्यात यावा. कोरोना काळात त्यांनी स्वत:च्या व स्वत:च्या कुटूंबाच्या जिविताची पर्वा न करता इमानेइतबारे काम केलेले आहे. एनएमएमटीच्या बसेसचे रूग्णवाहिकांमध्ये रूपांतर केलेले आहे. त्या बसेसची रोज पाण्याने स्वच्छता करणे, सफाई करणे आदी कामे त्यांनी कोरोना काळात कोणतीही तक्रार न करता केलेली आहे.
५ ) सिडको व म्हाडाकडून देण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी आवश्यक असणारे कोव्हिड योध्दा प्रमाणपत्र कामगारांना देण्यात यावे.
६ ) गणवेशचे शिलाईचे पैसे प्रशासनाने येत्या पगारात देण्यात यावे. तसेच यापुढे गणवेशचा कापड आणि शिलाईचे पैसे परिवहनकडूनच देण्यात यावे.
७ ) १ सप्टेंबर २०२० ते ३१ ऑगस्टपर्यंतचा दिवाळी बोनस, पगार दिवाळी अगोदर कामगारांना देण्यात यावा.
या मागण्या सादर करताना कामगार नेते रवींद्र सावंत यांनी परिवहन विभागातील कामगारांच्या समस्या २०१५ पासून प्रलंबि असाव्यात, आपल्याच सुविधांसाठी त्यांना गेली ७ वर्षे संघर्ष व पाठपुरावा करावा लागणे हे परिवहन विभागाचे अपयश आहे. श्रीमंत महापालिका, स्वमालकीचे धरण असणारी महापालिका, अडीच हजार कोटींच्या ठेवी असणारी महापालिका, केंद्र व राज्य पातळीवर पुरस्कार मिळविणारी महापालिका असा नावलौकीक असणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या परिवहन विभागाकडून कामगारांचे शोषण व्हावे ही लाजिरवाणी बाब असल्याचे सांगत कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आपला संताप व्यक्त केला.
कामगारांच्या या समस्या आजही परिवहन प्रशासन दरबारी प्रलंबितच आहेत. कोरोना महामारीच्या काळात या कामगारांनी केलेल्या प्रशंसनीय कामगिरीची दखल घेत प्रशासनाने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. कोरोना महामारीच्या काळात परिवहनच्या कंत्राटी कामगारांनी बस धुण्याचे काम केले. बसचे रूपांतर रूग्णवाहिकेत झाले, त्या रूग्णवाहिका स्वच्छ करण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले. स्वत:च्या व घरच्यांच्या जिविताची पर्वा न करता या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात काम करूनही या कामगारांना कोरोना योध्दा प्रमाणपत्र देण्यास महापालिका टाळाटाळ करत आहे. हक्काचा एरियस त्यांना उपलब्ध करून दिला जात नसल्याचे सांगताना कामगार नेते रवींद्र सावंत यांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्येचा पाढा वाचला. १५ दिवसात परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या न सुटल्यास परिवहन व्यवस्थापकांच्या दालनात बसून आंदोलन छेडण्याचा इशाराही रविंद्र सावंत यांनी यावेळी दिला. परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपण पालकमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे यांनाही भेटून निवेदन देणार असल्याचे रविंद्र सावंत यांनी सांगितले.