नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १२ मधील श्री गणेश रामलीला मैदानावर आजपासून आगरी-कोळी महोत्सवास सुरूवात होत असून अखिल आगरी कोळी समाजप्रबोधन ट्रस्टच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे.
बुधवार, दि. २३ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ यादरम्यान हा आगरी कोळी महोत्सव रंगणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सिडकोचे माजी संचालक, नवी मुंबई महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत हे या महोत्सवाचे निमंत्रक आहेत. २३ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून स्थानिक कलाकार आपली कला यावेळी सादर करणार आहेत. तसेच नेरुळ गावातील ग्रामस्थांचा भजनाचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे. २४ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान सांयकाळी ६ ते १० दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ फेब्रुवारी रोजी राकेश नाईक यांचा मराठी-हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम, २५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती, २६ फेब्रुवारी रोजी बबन वैती यांचा दर्या सारंगा, २७ फेब्रुवारी रोजी रोहन पाटील यांचा नवी मुंबई आगरी-कोळ्यांची, २८ फेब्रुवारी रोजी ओम वीरभद्र नाट्यमंडळाचे दशावतार नाट्य, १ मार्च रोजी नेरूळ नवी मुंबईचा नाखवा, २ मार्च रोजी लोकधारा आगरी-कोळ्यांची, ३ मार्च रोजी उमेश कामटेकर यांचा लावण्यसंग्राम, ४ मार्च रोजी सुपरहिट लोकगीते, कोळीगीते, ५ मार्च रोजी मिलिंद म्हात्रे यांचे जय हनुमान कलामंच नृत्य, ६ मार्च रोजी दर्या हाच आमुचा राजा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आगरी-कोळी महोत्सवामध्ये खवय्यांना विविध प्रकारच्या मासळींचा आस्वाद घेता येणार आहे. झणकेबाज गावठी मटन व भाकर याबरोबरच अन्य खाद्यपदार्थांचीही रेलचेल असणार आहे. लहान मुलांसाठी दरवर्षी खेळणी, पाळणा याचे विशेष आकर्षण असते. आगरी-कोळी संस्कृतीचा परिचय देणारे घर, शेतीचे अवजारे, मासे पकडण्याचे साहित्य, एकवीरा आईचे मंदिर आदी दरवर्षी महोत्वाचे खास आकर्षण असते. नवी मुंबई, ठाणे, मुंबईची उपनगरे, उरण-पनवेल भागातून मोठ्या प्रमाणावर नागरीक या आगरी-कोळी महोत्सवामध्ये सहभागी होत असतात. नवी मुंबईकरांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महोत्वाचे आयोजक नामदेव भगत यांनी केले आहे.