स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतन विलंब, ईएसआयचे पैसे कापूनही न मिळणारी सुविधा, कामगारांना नातवंडे येवूनही ईएसआय स्लीपवर अविवाहित उल्लेख या समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची लेखी मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सर्वप्रथम आज २३ मार्च, अजूनही मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार झालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे मूषक नियत्रंणच्या कर्मचाऱ्यांनी कदाचित आत्महत्या केल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येईल. मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतन नेहमीच विलंबाने होत असते. गेली अनेक वर्षे वेतन विलंबाने त्यांची आर्थिक ससेहोलपट होत आहे. त्यांना कोठेतरी आता न्याय मिळावा अशी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ईएसआयचे गेली अनेक वर्षे पैसे कापले जात आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना ईएसआयच्या माध्यमातून आजतागायत कोणतीही वैद्यकीय सुविधा देण्यात आलेली नाही. काही मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना नातवंडे आली आहेत, तरी त्यांच्या ईएसआयच्या स्लीपवर अविवाहित (unmarried) असा उल्लेख आहे. ते दुरूस्ती करण्यासाठी गेले असता त्यांना विवाह प्रमाणपत्र आणण्यास सांगितले जात आहे. ज्यांना नातवंडे आली आहेत, त्यांनी कुठे विवाहपत्रिका व इतर पुरावे शोधायचे? बॅक पासबुक, निवडणूक आयोग स्लीप हे पुरावे ग्राह्य मानून त्यांच्या ईएसआय स्लीपवरील अविवाहित काढून टाकून त्याजागी विवाहित असा उल्लेख होणे आवश्यक आहे व या कामगारांच्या वेतनातून ईएसआयचे पैसे कापले जात असतील तर त्यांना ईएसआयचे सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतन विलंबाने होत आहे, ते दर महिन्याला वेळेवर मिळावे. ईएसआयचे पैसे कापूनही न मिळणारी सुविधा मूषक नियत्रंण कर्मचारी व त्यांच्या परिवाराला तात्काळ सुरू करावी. कामगारांना नातवंडे येवूनही ईएसआय स्लीपवर अविवाहित असा उल्लेख आहे, त्या ठिकाणी विवाहित असा उल्लेख करण्यासाठी महापालिका प्रशासननाने पुढाकार घ्यावा. या समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.