नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ८ मधील हुतात्मा बाबू गेनू मैदानाची दुरावस्था दूर करण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
सानपाडा नोडमधील सानपाडा सेक्टर ८ मध्ये हुतात्मा बाबू गेनू मैदान आहे. पालिका प्रशासनाकडून या मैदानाची डागडूजी व देखभाल वेळोवेळी केली जात नसल्याने या मैदानाला बकालपणा प्राप्त झालेला आहे. मैदानाची दुरावस्था झाली असून पालिकेने मैदानाचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. या मैदानावर प्रशासनाने लाल माती पांगविल्यास स्थानिक भागातील सिडको वसाहतीमधील मुलांना कबड्डी, खो-खो आदी मैदानी खेळ खेळणे शक्य होईल आणि अन्य खेळ खेळणाऱ्या मुलांना पडल्यावरही दुखापत होणार नाही. या मैदानात सांयकाळनंतर अंधार पडतो. मैदानामध्ये माफक प्रमाणावर उजेड पडणे आवश्यक आहे. मैदानात वीजव्यवस्थेतून प्रकाश उपलब्ध झाल्यास रात्री ११ वाजेपर्यत विभागातील स्थानिक मुला-मुलींना मैदानी खेळ खेळणे शक्य होईल. मैदानाच्या सभोवताली स्ट्रीट लाईन उपलब्ध केल्यास मैदानात पुरेसा प्रकाश उपलब्ध होईल आणि परिसराच्या सौदर्यीकरणातही वाढ होईल. मुलांना खेळण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या स्थानिक भागातील मुला-मुलींमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी पालिका प्रशासनानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. मैदानाची देखभाल केल्यास व सुशोभीकरण केल्यास मोबाईलच्या खेळात अडकलेली मुलेमुली मैदानी खेळासाठी मैदानावर उतरतील. क्रिडा क्षेत्रात खेळाडू घडविण्यासाठी मैदाने सुस्थितीत असणे आवश्यक आहे. सानपाडा सेक्टर ८ मधील हुतात्मा बाबू गेनू मैदानावर मोठ्या प्रमाणावर लाल माती पांगिवण्यात येवून मैदानाचे सुशोभीकरण लवकरात लवकर करावे तसेच मैदानाच्या सभोवताली कोपऱ्या कोपऱ्यावर पथदिवे लावून मैदानातील अंधाराची समस्या नष्ट करावी. यासाठी संबंधितांना निर्देश देवून स्थानिक विभागातील रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.