- नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ मधील दोन आणि ४ येथील जुईनगर सेक्टर २५ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान तसेच जुईनगर चिचोंली तलावालगतच्या उद्यानातील समस्यांचे निवारण करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर व महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर दोन येथे छत्रपती संभाजी महाराज उद्यान, नेरूळ सेक्टर दोनमधील दत्तात्रेय सोसायटीलगतचे महापालिकेचे सार्वजनिक उद्यान, नेरूळ सेक्टर चार येथील विभाग कार्यालयासमोरील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान, जुईनगर सेक्टर २५ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि जुईनगर सेक्टर २३ येथील चिंचोली तलावालगतचे उद्यान या पाच उद्यानात स्वच्छता व सफाई नीट होत नसल्याने पाचही उद्यानाला बकालपणा प्राप्त झाला आहे. उद्यानात गवत वाढले असून नेहमीच झाडांवरून पडलेल्या सुक्या पानांचा पालापाचोळा पडलेला दिसून येतो. उद्यानांतील खेळणी तुटलेली असल्याने लहान मुलांना खेळण्यांचा काहीही फायदा होत नाही. मॉर्निग वॉकसाठी अथवा उद्यानात चालण्यासाठी बनविण्यात पथामधील पेव्हर ब्लॉकही निखळल्याने ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना व लहान मुलांना तेथून चालताना त्रास होत आहे. अनेकदा पाय अडखळून ज्येष्ठ नागरिक व महिला पडल्याही असल्याचे विद्या भांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या पाचही उद्यानामध्ये सफाई व स्वच्छता नियमित होणे आवश्यक आहे. उद्यानात स्वच्छता राहील्यास उद्यानात येणाऱ्या रहीवाशांचे मनही प्रसन्न राहील. बकालपणा संपुष्ठात येईल. सुकलेल्या पानाचे पालापाचोळा दिसून येणे म्हणजे सफाईच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखे आहे. उद्यानातील तुटलेल्या खेळण्याची दुरूस्ती व्हावी, जेणेकडून लहान मुलांना खेळण्याचा लाभ घेता येईल. मॉर्निग वॉक तसेच उद्यानात चालण्यासाठी बनविलेल्या पथामधील निखळलेल्या पेव्हर ब्लॉकच्या ठिकाणी नवीन पेव्हर ब्लॉक बसवून डागडूजी केल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना होत असलेला त्रास संपुष्ठात येईल. जुईनगर व नेरूळमधील महापालिकेच्या या पाच उद्यानातील सुशोभीकरणासाठी व उल्लेख केलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.