अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांनाही कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता अदा करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
सर्वप्रथम कोरोना महामारीमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना त्या कालावधीत केलेल्या कामाबाबत, उपस्थितीबाबत ठरावाला मंजुरी देवून विशेष भत्ता मंजुर केलात व संबंधितांना तो विशेष भत्ता देण्याचे महापालिका प्रशासनातील संबंधितांना निर्देशही दिलेत, त्याबाबत महापालिका प्रशासनाचे कर्मचाऱ्यांच्या वतीने व नवी मुंबई इंटकच्या वतीने मनापासून आभार कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच मानले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात महापालिका परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी संवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांनी तसेच परिवहनच्या बसेसवरील चालक व वाहकांनी बजावलेली अतुलनीय कामगिरी नवी मुंबईकरांसाठी खरोखरीच विस्मरणीय आहे. कोरोना महामारीत परिवहनच्या बसेसचे प्रशासनाकडून रूग्णवहिकेत रूपांत केले होते. रूग्णांची ने-आण करण्याचे काम याच बसेसमधून करण्यात आले. या कालावधीत कोरोनाग्रस्त रूग्णांचे निवास, नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रूग्णालये ते कोविड सेंटरपर्यत कोरोनाग्रस्त रूग्णांना घेवून जाणे व उपचार झाल्यावर घरी नेवून सोडणे ही कामे परिवहनच्या चालक व वाहकांनी केलेली आहे. रूग्णवाहिका बनलेल्या बसेसची दररोज सफाई, स्वच्छता, बसेस धुणे आदी कामे कंत्राटी संवर्गातील तसेच ठोक मानधनावरील सफाई कर्मचाऱ्यांनी केलेली आहेत. ही कामे करताना त्यांनी स्वत:च्या जिविताची तसेच त्यांच्या संपर्कात असणाऱ्या त्यांच्या घरातील सदस्यांच्या जिविताची पर्वा न करता नवी मुंबईकरांच्या आरोग्याला व जिवितसंरक्षणाला प्राधान्य दिले आहे. या कामाची प्रशासनाने दखल घेवून त्यांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक होते. तथापि गौरव तर दूरच परंतु या सफाई कर्मचाऱ्यांना व चालक-वाहकांना कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता देण्याबाबतही पालिका प्रशासनाने गंभीरपणे विचार न करावा ही या सफाई कर्मचाऱ्यांसाठी तसेच परिवहनच्या चालक-वाहकांसाठी शोकांतिका आहे. कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता या सफाई कर्मचाऱ्यांना व परिवहन चालक-वाहकांनाही लागू करून त्यांना तो देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.