अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिका उद्यान व क्रिडांगणात संगीत यंत्रणा उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये सागरदिप, एव्हरग्रीन, नेरूळ सीव्ह्यू, वरूणा, एव्हरग्रीन या गृहनिर्माण सोसायट्यांच्या मध्यभागती महापालिका प्रशासनाने उद्यानव व क्रिडांगण विकसित केलेले आहे. या उद्यानामध्ये नेरूळ सेक्टर सहामधील तसेच सारसोळे गावातील रहीवाशी व ग्रामस्थ येत असतात. सकाळी मॉर्निग वॉकसाठी, व्यायामासाठी मोठ्या संख्येने पुरूष, महिला व ज्येष्ठ नागरिक येतात, सांयकाळपासून रात्री उशिरापर्यत रहीवाशी उद्यानात असतात. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने संगीत यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास रहीवाशांना दिलासा मिळेल. सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्येक जण हतबल झाला आहे. अर्थकारण विस्कळीत झाले आहे. त्यामुळे काही वेळ मनशांतीसाठी रहीवाशी उद्यानात येत असतात. पालिका प्रशासनाने संगीत यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास त्या यंत्रणेच्या माध्यमातून सकाळी अभंग, हरिपाठ, भावगीते, भक्तीगीते आदी गाणी सकाळच्या व सांयकाळच्या वेळी रहीवाशांना ऐकावयास मिळतील. रहीवाशांचे मन प्रसन्न होईल. आज प्रत्येक जण हतबल झाला आहे. संगीत यंत्रणेच्या माध्यमातून रहीवाशांच्या कानावर भावगीते पडणे आवश्यक आहे. आपण स्थानिक रहीवाशांच्या मागणीचा गांभीर्याने सकारात्मक विचार करून संबंधितांना या उद्यान व क्रिडांगणामध्ये संगीत यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देवून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.