संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कामगारांची बैठक आयोजित करून समस्या जाणून घेणे व मार्च २०२२ या महिन्याचा पगार एप्रिल महिन्याची १९ तारीख उलटली तरी अद्यापि न झाल्याबाबतची लेखी तक्रार समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही वर्षापासून महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कामगारांची ससेहोलपट सुरूच आहे. त्यांना अनेकदा दोन-तीन महिने वेतन दिले जात नाही. आज एप्रिल महिन्याची १९ तारीख लोटली तरी मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन झालेले नाही. वेतन महापालिका देत असेल तर ठेकेदारांची मध्यस्थी हवी कशाला? या कामगारांनी कोरोना काळातही स्वत:ची व स्वत:च्या परिवाराची काळजी न घेता नवी मुंबईकरांची सेवा केलेली आहे. ठेकेदार दर महिन्याला वेतन विलंब करत असतानाही महापालिका प्रशासन ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकत नाही? वर्षानुवर्षे कामगारांचे शोषण करणाऱ्याच ठेकेदाराला मूषक नियत्रंणचा ठेका का दिला जात आहे? आपल्या राज्यात, देशात मूषक नियत्रंण मोहीम राबविण्यासाठी अन्य नवीन ठेकेदार भेटत नाही काय? या ठेकेदाराला पुन्हा ठेका न देता नवीन ठेकेदार नियुक्त करावा. नवीन ठेकेदार भेटेपर्यंत महापालिका प्रशासनाने मूषक नियत्रंण कामगारांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळेवर वेतन देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असे साकडे निवेदनातून संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांना घातले आहे.
वेतन विलंबाप्रमाणे एरियसचाही विषय प्रलंबित आहे. चेक तयार आहेत. मुख्यालयात फाईली आहेत अशा नवनवीन अफवांमुळे मूषक नियत्रंण कामगार त्रस्त झाला आहे. मूषक नियत्रंण कामगारांच्या ईएसआयसीच्या नावाखाली वेतनातून ठराविक रक्कम कापली जात असली तरी या कामगारांना आरोग्य सुविधेचा लाभ आजतागायत मिळालेला नाही. वेतनाची स्लीप, पीएफ याबाबतही नानाविध समस्यांचा मूषक नियत्रंण कामगारांना सामना करावा लागत आहे. कामगारांना वाली नाही. ठेकेदार गेली अनेक वर्षे शोषण करत असतानाही महापालिका प्रशासन दखल घेत नाही. मूषक नियत्रंण कामगारांची संख्या जेमतेम दोन आकडी आहे. या कामगारांची आपण स्वत: बैठक आयोजित करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
०००००००००००००००००००००० ०००००००००००००००००० ००००००००००००००
बातमीसाठी संपर्क : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई लाईव्हचे कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, भुखंड क्रमांक ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई