९०८ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागास करण्यात आले हस्तांतरण
सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिडकोतर्फे २४ मे रोजी ९०८ हेक्टर कांदनवळाखालील जमीनीच्या हस्तांतरणाबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. यापैकी २७९ हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात असून सिडको क्षेत्रातील उर्वरित ६२९ सिडकोच्या ताब्यात नसलेल्या जमीनीकरिता ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून १८ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या बैठकीत सिडकोस कांदळवनाखालील जमीन वन विभागास हस्तांतरित करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते.
या प्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, सिडकोचे मुख्य नियोजनकार रवी कुमार, आणि श्री. आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण व संवर्धन उपक्रम आणि शाश्वत विकासासाठी सिडकोने नेहमीच सहकार्य केले आहे. याचाच एक भाग म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर कांदळवन क्षेत्राचे वन विभागास हस्तातंरण करण्यात आले आहे.
सिडको महामंडळाच्या ताब्यात असलेली ठाणे तालुक्यातील सुमारे १४५८ हेक्टर कांदळवनाखालील क्षेत्र यापूर्वीच वनविभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आहे. पर्यावरण मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ९०८ हेक्टर कांदनवनाखालील जमीनीचे हस्तांतरणाबाबतची प्रक्रीया सिडकोतर्फे पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी २७९ हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात असून उर्वरित सिडकोच्या ताब्यात नसलेल्या जमीनीकरिता ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत सिडकोने पनवेल आणि उरण तालुक्यांतील कांदळवनाखालील १२५८ हेक्टर जमिनीचे हस्तातंरण पूर्ण केले असून नवी मुंबईतील संपूर्ण कांदळवन क्षेत्राचे हस्तातंरण करण्याची प्रक्रिया सिडकोने पूर्ण केली आहे.
०००००००००००००० ००००००००००००००००००००० ००००००००००००००० ००००००००
कार्यालय : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील, शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई