अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनामध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे केली आहे.
सध्या शहरामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. कोरोना महामारीच्या तीनही लाटेमध्ये परिवहन उपक्रमाच्या सफाई कामगारांनी उल्लेखनीय व खऱ्या अर्थांने प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे. कोरोना रूग्णांना घरापासून तसेच नागरी आरोग्य केंद्रापासून कोव्हिड सेंटरपर्यत एनएमएमटीच्या बसेसमधून आणले जात होते व सोडलेही जात होते. बसेसना रूग्णवाहिकेचे स्वरूप देण्यात आले होते. या बसेसची दररोजची सफाई, बसेस धुणे आदी कामे दररोज सफाई कामगार करत होते. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची वाहतुक ज्या बसेसमधून केली जात होती, त्या बसेस स्वत:च्या व स्वत:च्या घरच्यांच्या जिविताची पर्वा न करता सफाई कामगार साफ करत होते. त्यांचे कौतुक होण्याएवजी त्यांना आजतागायत एक रूपयांही कोव्हिड भत्ता महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही. आपण या कर्मचाऱ्यांना तात्काळ कोव्हिड भत्ता उपलब्ध करून देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आपणाकडे व परिवहन विभागाकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु या गोरगरीब सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे महत्व पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे कोव्हिड काळात रूग्णावाहिका कम परिवहन बसेसची सफाई करणाऱ्या सफाई कामगारांच्या कामांची दखल घेतली जात नसल्याची नाराजी कामगारांकडून व्यक्त होत आहे. त्यांचे कार्य पाहता शक्य तितक्या लवकर या कामगारांना कोव्हिड भत्ता देण्याविषयी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.