स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, असुविधा, अडचणी याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी शिरीष आदरवाड यांच्याबरोबर विस्तृत चर्चा झाली असून बैठकीत त्यांनी लवकरात लवकर प्रशासनाकडून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिली.
मुख्य अग्निशमन अधिकारी शिरीष आदरवाड यांच्याशी अग्निशमन विभागातील समस्यांबाबत कामगार नेते रविंद्र सावंत यांनी कामगार शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन चर्चा केली. आदरवाड यांनी या बैठकीत कामगारांच्या समस्या सोडविण्याचे व त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. आगामी बैठकीत अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या असुविधांचा व इतर मागण्यांबाबत चर्चा करून त्याही मार्गी लावणार असल्याचे आदरवाड यांनी शिष्टमंडळाला सांगितले असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी सांगितले.
या बैठकीत १) सेवाप्रवेश नियमानुसार सहाय्यक केंद्र अधिकारी यांची रिक्त पदे ड्रायव्हर,ऑपरेटर व अग्नीशमन प्रणेता यांची ५०% प्रमाणे भरण्यात यावी. जेणेकरून बरीच वर्षे सहाय्यक केंद्र अधिकारी या पदावर प्रभारी म्हणून कार्यरत असणाऱ्या अधिकारी वर्गाला योग्य तो न्याय मिळेल. २) सेवाप्रवेश नियमानुसार ड्रायव्हर आपरेटर या पदाच्या रिक्त जागा लवकरात लवकर पदोन्नतीने भरण्यात याव्या. ३) २००७ च्या भर्ती मधील कर्मचारी यांना आश्वासित प्रगति योजना लवकरात लवकर मंजूर करणे बाबत.
४) सातव्या वेतन आयोगानुसार सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला अतिकालीन भत्ता मिळणेबाबत. ५) ७ व्या वेतन आयोगानुसार रिस्क पे आणि कॉल पे मिळणेबाबत. ६) अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी वर्गाला जास्तीत जास्त प्रमाणात अग्निशमन पाठ्यक्रम प्रशिक्षणासाठी पाठवणेबाबत. ७) नवीन सर्व कर्मचारी वर्गाचा इंक्रिमेंटचा फरक रोखीने मिळणेबाबत, ८) केंद्र अधिकारी व सहाय्यक केंद्रअधिकारी यांचा जबाबदाऱ्या व ड्यूटीची माहिती मिळणेबाबत या मागण्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासमवेत पुरुषोत्तम जाधव, अरुण भोईर, एकनाथ पवार, रोहन कोकाटे, प्रशांत गोळे, गणेश गाडे, दत्तात्रय पाटील, भूषण देशमुख, तौसिफ लाड खान हे सहभागी झाले होते.