स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :जुन्या प्रभाग रचनेतील प्रभाग ९६ मधील आणि नवीन प्रभाग रचनेतील प्रभाग ३६ मधील समस्यांबाबत समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करताना समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली आहे.
गणेश भगत यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात,
- सध्या पावसाळा सुरू झाला आहे. परिसरात व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान पालिका प्रशासनाने राबविणे आवश्यक आहे. साचलेले पाणी, गटारे, सोसायटी आवार यामध्ये जंतुनाशके व अळीनाशके टाकण्यात यावी. डासांचा उद्रेक वाढला असल्याने डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती आहे.
- परिसरातील गटारांवरील लोखंडी झाकणे नेहमीच चोरीला जात आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्यात अथवा अंधारामध्ये रहीवाशी त्या गटारांजवळ पडून त्यांना शारिरीक जखमा झाल्या आहेत, वाहनांचेही नुकसान होत आहे. याबाबत सातत्याने पालिका प्रशासनाकडे व स्थानिक नेरूळ पोलिस ठाण्यात आम्ही लेखी तक्रारी केल्या आहेत. आपणही पालिकेच्या वतीने स्थानिक नेरूळ पोलिस ठाण्यात गटारांवरील लोखंडी झाकणे चोरीला जात असल्याची तक्रार करावी. जेथे झाकणे चोरीला गेली आहेत, तिथे नवीन झाकणे तात्काळ बसविण्यात यावीत. पावसाचे पाणी साचल्यास दुर्घटना घडण्याची भीती आहे.
- परिसरात काही ठिकाणी पालिका प्रशासनाने वृक्षछाटणी प्रशासनाने अर्धवट अवस्थेत सोडलेली आहे. काही ठिकाणी वृक्षछाटणी केलेली आहे, तर काही ठिकाणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुसळधार पावसात अथवा सोसाट्याचा वारा आल्यास ठिसूळ झालेल्या फांद्या पडून जिवित व वित्त मालमत्तेची हानी होण्याची भीती आहे.
- पाऊस सुरू झाला आहे. पदपथ आता निसरडे होण्यास सुरूवात होईल. पदपथावर रहीवाशांना चालणे अवघड होईल. रहीवाशी, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक त्यावरून घसरून त्यांना शारीरीक दुखापत होण्याची भीती आहे. प्रशासनाने या पावसाळा कालावधीत किमान तीन वेळा परिसरातील पदपथावर तसेच उद्यानातील मॉर्निग वॉकवर ब्लिचंग पावडरची फवारणी करावी. त्यामुळे पदपथ निसरडे होणार नाहीत व स्थानिक रहीवाशांना इजाही होणार नाही.
- परिसरात उंदरांचा उपद्रव वाढीस लागला आहे. दोरीवर वाळत घातलेले कपडे, उभ्या असलेल्या वाहनाच्या वायरी कुरतडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नियमितपणे विभागामध्ये मूषक नियत्रंण मोहीम राबविण्यात यावी.
- परिसरातील बाह्य व अंर्तगत रस्त्यावर वाहने अनेक दिवस नाहीतर महिनोनमहिने उभी असतात. त्यामुळे वाहतुक समस्या निर्माण होते. वाहने काढली जात नसल्याने त्या ठिकाणी सफाई होत नाही. कचऱ्याचे ढिगारे साचतात. आपण रस्त्यावर काही महिने उभ्या असणाऱ्या वाहनांवर अनधिकृत व बेवारस म्हणून नोटीस लावावी. ज्यांची वाहने असतील ते हटवतील, जे हटवणार नाहीत, ती वाहने पालिका प्रशासनाने जमा करावीत.
- नेरूळ सेक्टर १६ मध्ये महापालिकेचे छत्रपती संभाजी उद्यान आहे. या उद्यानातील खेळणी पूर्णपणे तुटलेली आहेत. दोन वर्षे उद्यानातील खेळणी दुरूस्तीसाठी सातत्याने प्रशासनाने लेखी पाठपुरावा केलेला आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे लहान मुलांना खेळणी खेळता येत नाही आणि या तुटलेल्या खेळण्यांमुळे उद्यानालाही बकालपणा आलेला आहे.
- सेक्टर १६ मध्ये सीब्रीज टॉवरजवळ असलेल्या बसथांब्याची दुरावस्था झालेली असून केवळ थडगेच राहीले आहे. या बसथांब्याची दुरूस्ती व सुशोभीकरण करणे आवश्यक आहे.
या समस्यांचा उहापोह केला आहे.
नवीन पुनर्रचनेतील प्रभाग ३६ (जुना प्रभाग ९६) मधील समस्या गणेश भगत यांनी महापालिका आयुक्तांसमोर सादर केल्या आहेत. समस्या निवारणासाठी सातत्याने लेखी निवेदनाचा रतब टाकूनही समस्यांचे निवारण होत नाही, पालिका प्रशासन समस्यांचे गांभीर्य समजून घेत नाही. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे लोकनाराजीचा आम्हाला सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.