नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये पदपथ, उद्यानात चालण्याच्या जागेवर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. या समस्या निवारणासाठी १४ जुलै २०२२ रोजीही आमले यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर, उद्यानातील चालण्याच्या जागेवर पावसाळा कालावधीत किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी निवेदनात केली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून संततधार पाऊसाला सुरूवात झालेली आहे. आठ – दहा दिवस संततधार पाऊस पडल्यावर पदपथांवर, गावातील अंर्तगत पायवाटांवर, महापालिका उद्यानातील मॉर्निग वॉक व फिरण्यासाठी बनविलेल्या मार्गावर शेवाळ साचण्यास सुरूवात झालेली आहे. पदपथ व गावातील पायवाटा, उद्यानातील चालण्याच्या जागा निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून चालणाऱ्या रहीवाशांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना पाय घसरून पडल्याने जखमाही होत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या या उर्वरित अडीच महिन्याच्या कालावधीत किमान एक महिन्याच्या अंतराने पायवाटा, पदपथ, उद्यानातील चालण्याच्या जागा या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करून संबंधित जागांवर शेवाळ साचणार नाहीत, या जागा निसरड्या होणार नाहीत, या जागावरून चालताना कोणत्याही दुर्घटना घडणार नाहीत याची पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी. यापूर्वीही या समस्येबात आपणास निवेदन सादर केले होते. आपणाकडून तात्काळ संबंधितांकडे कार्यवाहीसाठी पत्र पाठविण्यात आले. परंतु कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता, पावसाळा कालावधीत महापालिका प्रशासनाने महापालिका प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील अंर्तगत पायवाटांवर, उद्यानात चालण्याच्या जागांवर किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करण्याविषयी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.