अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात गोवर आजाराचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला निर्देश देण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
आपल्या शेजारीच असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गोवर या आजाराचा उद्रेक झाला असून त्या ठिकाणी एक हजाराहून अधिक संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत. मंगळवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी गोवर संशयित सात रुग्णांचा मृत्यूही झालेला आहे. विशेषत: नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावरच असलेल्या गोवंडी हे गोवरचे मुख्य केंद्रबिदू आहे. नवी मुंबई शहरामध्ये शिक्षण, रोजगार व व व्यवसायासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईकर नवी मुंबई शहरामध्ये येत असतात. गोवरचा गोवंडीमध्ये उद्रेक होण्यास असलेल्या अनेक कारणांपैकी डंम्पिंग ग्राऊंडची परिस्थिती प्रामुख्याने एक कारण आहे. गर्दी व संपर्क सध्या गोवर या आजाराच्या वाहकामध्ये प्रमुख भूमिका बजावत असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबई शहराच्या उंबरठ्यावर गोवर आता आला असल्याने आपल्या नवी मुंबई शहरातही कोणत्याही क्षणी गोवरचा उद्रेक होण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने गोवरच्या पार्श्वभूमीवर सतर्क होणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या गोवर लसीकरणाचा आढावा घेऊन दिघा ते बेलापुरदरम्यान गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याशिवाय गोवर आजाराविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक प्रभागामध्ये व्यापक अभियान राबविणे आवश्यक आहे. गोवर आपल्या शहरात येण्यापूर्वीच तो वेशीवरच थोपविण्यासाठी आणि नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात गोवर आजाराचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.