Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सीसीटीव्ही प्रकल्प ३१ मार्चपर्यंत पूर्ण करून गो लाईव्ह सुरु व्हायलाच हवे असे निर्देश देत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी गो लाईव्ह करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या विद्युत / संगणक विभागाने कॅमेऱ्यांची स्पीड तपासणी करावी, इंटरनेट कनेक्शनची अपेक्षित बँडविड्थ प्राप्त होत असल्याची खात्री करून घ्यावी, ॲटोमॅटीक नंबर प्लेट कॅप्चरींग होत असल्याचे तपासावे तसेच रेड लाईट व्हायलेशन अशा सर्व बाबी योग्य रितीने व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याबाबत बारकाईने खातरजमा करून घ्यावी अशा सूचना दिल्या.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध स्वरुपाचे १५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून सदरच्या कामाचा सविस्तर आढावा घेताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ३१ मार्चनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही असे स्पष्ट करीत त्यानंतर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल असे निर्देशित केले. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता सुनिल लाड व टाटा ॲडव्हान्स सिस्टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मे. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लि. यांच्या दृष्टीने नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात राबविला जात असलेला हा सीसीटीव्ही प्रकल्प अभिमानस्पद असून यामुळे शहराच्या सुरक्षेला नवा आयाम मिळणार आहे. त्यादृष्टीने लवकरात लवकर व दर्जेदार पध्दतीने विहित वेळेत काम पूर्ण होण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
या प्रकल्पांतर्गत हाय डेफिनेशनचे फिक्सड् व हायस्पीड कॅमेरे बसविण्यात येत असून स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचनासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येत आहेत. २७ मुख्य चौकांमध्ये १०८ कॅमेरे बसविण्यात येत असून बस डेपो, मार्केट्स, उद्याने, मैदाने, चौक, नाके, वर्दळीची ठिकाणे, नमुंमपा कार्यालये, पामबीच, ठाणे बेलापूर रोड, सायन पनवेल असे अधिक रहदारीचे रस्ते येथे हाय डेफिनेशनचे कॅमेरे बसविण्यात येत आहेत. ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स बसविण्यात येत आहेत. याशिवाय नवी मुंबई पोलीसांच्या मागणीनुसार खाडीकिनारी ९ ठिकाणी थर्मल कॅमेरे घातपात व देशविघातक कृत्यांवर बारीक नजर ठेवण्यासाठी बसविले जात आहेत. या सीसीटीव्ही प्रणालीचा मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष नमुंमपा मुख्यालय येथे असणार असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय या प्रणालीशी जोडलेले असणार आहेत. नमुंमपा मुख्यालय व पोलीस आयुक्तालय याचे डेटा सेंटर असणार आहे.
या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शहर अभियंता स्तरावरून दर पंधरवड्याला आढावा घेण्यात यावा तसेच आयुक्त स्तरावरूनही दर महिन्याला बैठक घेऊन या कामावर बारीक लक्ष ठेवले जाईल असे स्पष्ट करतानाच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने या महत्वाच्या प्रकल्पामुळे नवी मुंबईकर नागरिकांच्या सुरक्षेमध्ये लक्षणीय भर पडणार असून या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन विहित वेळेत हे काम पूर्ण करावे व या कामाच्या दैनंदिन प्रगतीकडे महानगरपालिकेच्या विद्युत / संगणक विभागाने काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश दिले.