अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नाताळच्या सुट्टीमध्ये नवी मुंबईतील शालेय बालकांसाठी कोरोना लसीकरणासाठी तातडीने माता-बाल रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रामध्ये अभियान राबविण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
शेजारील देशांमध्ये वाढत्या कोरोना महामारीचा उद्रेक पाहता आपल्या नवी मुंबई शहरावर आणि नवी मुंबईकरांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरलेले पहावयास मिळत आहे. महापालिका प्रशासनाने शालेय वयोगटातील बालकांसाठी कोरोनाविषयक लसीकरण शिबीरही यापूर्वीच आयोजित केले होते. पण त्या दिवशी शाळेत नसणे, आजारपणामुळे लस घेवु न शकणे तसेच अन्य कारणांमुळे आजही नवी मुंबईतील शालेय बालके मोठ्या संख्येने लसीकरणापासून वंचित आहेत. सध्या मुलांना नाताळची सुट्टी लागलेली आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्रात तसेच माता बाल रुग्णालयात तातडीने शालेय बालकांसाठी कोरोना लसीकरण अभियान राबविल्यास मुलांना लसीकरण घेणे शक्य होईल. शेजारील देशात कोरोनाचा उद्रेक व सुरु असलेली विमानसेवा पाहता संबंधिताना तातडीने शालेय बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.