अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील वाहतुक कोंडी, मनमानी वाहन पार्किग तसेच रस्त्यावर फेरीविक्रेत्यांचे अतिक्रमण या समस्येतुन स्थानिक रहीवाशांची मुक्तता करण्याची लेखी मागणी नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा हा नवी मुंबईतील सर्वाधिक बकाल परिसर आहे, असे नाईलाजाने आम्हा स्थानिक रहीवाशांना तक्रारपत्राच्या सुरुवातीलाच नमूद करावे लागत आहे. या परिसराला बकाल करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाच्या नाकर्तेपणाचाच हातभार आहे, हेही आपणास स्पष्टपणे सांगत आहे. बाराही महिने परिसरात राजकारण्यांचे मोठ्या प्रमाणावर लागणारे अनधिकृत होर्डिग, बॅनर व अनधिकृत बॅनर, होर्डीग काढण्यास तसेच संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभाग टाळाटाळ करत आहे. परिसरात आपण फेरफटका मारल्यास पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले असून करदात्यांना पदपथाचा वापर करता येत नाही. लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांना ये-जा करण्यासाठी रस्त्यावरून वाहने चुकवावी लागतात. फेरीवाल्यांनी रस्त्यावरही अतिक्रमण केले असून वाहनांच्या जागेवर फेरीवाल्यांच्या हातगाड्यांनी ठाण मांडले आहे. पालिका अतिक्रमण विभाग यावरही कारवाई कधी करत नाही. काही ठिकाणी दुकानचालकांनी मार्जिनल स्पेसवर अतिक्रमण करताना दुकानातील साहित्य पदपथावरही ठेवले आहे. परंतु पालिकेच्या अतिक्रमण विभागाला कदाचित हे दिसत नसल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये वाहतुक कोंडीच्या समस्येने गेल्या काही महिन्यापासून भयावह स्वरूप धारण केले असून वाहतुक पोलिसांच्या मदतीने यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे. मेरेडियन सोसायटीसमोरून आपण सेक्टर सहामध्ये प्रवेश केल्यास अरूंद रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची बाराही महिने पार्किग दिसून येते. समोरासमोर आलेल्या रिक्षांनाही थांबून ये-जा करावी लागत आहे. मेरेडियन सोसायटी ते मच्छिमार्केटपर्यत गेल्यास आपणास वाहनांची पार्किग दिसून येईल. विक्रम बारमार्गे सेक्टर सहामध्ये प्रवेश करुन ते पालिका समाजमंदिरापर्यत फेरफटका मारल्यास आपणास दोन्ही बाजूने वाहने उभी केलेली पहावयास मिळतील. नेरूळ सेक्टर सहामध्ये पामबीच मार्गे आल्यास सुश्रुषा रुग्णालय ते अॅक्रोपॉलिस टॉवरपर्यतही रस्त्यावर वाहने उभी असल्याची पहावयास मिळतील. नेरूळ सेक्टर सहामध्ये बाहेरील तसेच अंर्तगत भागातही वाहनांच्या मनमानी पार्किग केलेले दिसून येत आहे. भविष्यात आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमनची वाहने जाण्यासाठीही एक ते दीड तासाचा अडथळा लागेल. मागे मेरेडियन सोसायटीत आगीची दुर्घटना घडली असता पालिकेच्याच अग्निशमन वाहनांना तेथे येण्यासाठी खूप अडथळे पार करावे लागले होते, याचीही आपण खातरजमा करु शकता. या समस्येवर आपण लवकरात लवकर तोडगा काढून स्थानिक रहीवाशांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
वाहतुक पोलिसांसमवेत नेरूळ सेक्टर सहाची पालिका प्रशासनाने पाहणी करून सुश्रुषा रुग्णालयाजवळील टेम्पटेशन, पालिका उद्यान ते अॅक्रोपॉलिस टॉवर या ठिकाणी नो पॉर्किग करावे. कारण हा अंर्तगत मोठ्या वर्दळीचा रस्ता आहे. या ठिकाणी वाहने उभी करण्यास पूर्णपणे बंदी आणावी. तसेच मेरेडीयन टॉवर ते मच्छिामार्केट तसेच विक्रम बार – नेरूळ सिव्ह्यू सोसायटी ते महापालिका समाजमंदिर या ठिकाणी सम-विषम पार्किग लागू करावी. तसेच सेक्टर सहा भागात अंर्तगत भागात बाराही महिने वाहने उभी असतात. ही वाहने कधीही सहसा बाहेर काढली जात नाही. दुकानांसमोर वाहने उभी असल्याने व्यावसायिकांना त्रास होत आहे. रहीवाशांना ये-जा करता येत नाही. साधी दुचाकी घेवून जाण्यास अडथळे होतात. दुकानासमोर वाहने लावू नका असे सांगितल्यास पालिकेचा रस्ता आहे, असे सांगत दुकानवाल्यांनाच शिवीगाळ करण्यात येते. त्यामुळे अंतर्गत भागात आठ ते दहा मीटरहून कमी असणाऱ्या रस्त्यांवर वाहने उभी करू नये यासाठी नो पॉर्किगचे फलक लावावेत. तसेच केवळ फलक न लावता दररोज वाहतुक पोलिसांना सेक्टर सहा परिसरात गस्त लावण्यास सुचित करावे व वाहतुक फलक मार्गदर्शनाचे पालन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. वाहतुक कोंडीची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असल्याने लवकरात लवकर समस्या निवारणासाठी सकारात्मक हालचाली सुरु करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.