अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मच्छी-मटण खवय्यांपासून ते लहान मुलांचे आकर्षण असलेला आगरी-कोळी महोत्सव नेरूळच्या रामलीला मैदानावर चार जानेवारीपासून सुरु होणार आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे न झालेल्या या आगरी-कोळी महोत्सवामध्ये सहभागी गर्दीचा उच्चांक मोडला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिडकोचे माजी संचालक, नवी मुंबई मनपातील ज्येष्ठ नगरसेवक तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या संकल्पनेतून या आगरी-कोळी महोत्सवाला सुरुवात झाली आहे.
अखिल आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टच्यावतीने ४ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत या आगरी-कोळी महोत्सवाचे नेरूळ सेक्टर १२ मधील रामलीला मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे आगरी-कोळी महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. सांयकाळी ५ नंतर रात्री ११ते ११.३० पर्यत नवी मुंबई, पनवेल-उरण, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबई शहर-उपनगर, भाईंदर भागातून नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात. नवी मुंबई शहर तसेच सभोवतालच्या भागातही विकसिकरणाच्या प्रक्रियेमुळे रोजगार, व्यवसाय, शिक्षण आदी माध्यमातून मोठ्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी स्थायिक झाले आहे. त्यांना येथील स्थानिकांची, प्रकल्पग्रस्तांची, आगरी-कोळी समाजाची संस्कृती समजावी यासाठी नामदेव भगत यांनी या आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यास सुरूवात केली आहे. अनेक दीड दशके ते या महोत्सवाचे यशस्विपणे आयोजन करत आहेत.
या महोत्सवामध्ये लागणारे विविध माशांचे, मटणांचे स्टॉल यावर खवय्यांची गर्दी तुटून पडलेली असते. लहान मुलांसाठी पाळण्यांपासून विविध खेळणी उपलब्ध असल्याने त्यांची चंगळच असते. दररोज व्यासपिठावर सांस्कृतिक विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्याने महोत्सवात येणाऱ्यांचे मनोरंजनही होते. तसेच स्थानिक ग्रामस्थांचे मंदिर, घर, घरातील शेतीची व मासेमारीची अवजारे त्यांचे पूर्वीचे जीवनमान दाखवून देत आहे. विशेष म्हणजे येथे सहभागी होणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही ठिकठिकाणी उपलब्ध असतात. या महोत्सवात नागरिकांनी त्यांच्या परिवारासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक अखिल आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टच्यावतीने नामदेव भगत यांनी केले आहे.