अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या माताबाल रुग्णालयात तसेच नागरी आरोग्य केंद्रात नवी मुंबईकरांसाठी बुस्टर डोस उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
चीन व अन्य शेजारील देशांमध्ये कोरोना महामारीचा झालेला उद्रेक आणि आपल्या देशाची सुरू असलेली विमानसेवा पाहता कोरोना महामारीची लागण आपल्या देशात होण्याची भिती देशामध्ये पुन्हा व्यक्त होवू लागली आहे. अर्थात या भीतीला व त्याबाबत सुरु असलेल्या चर्चेला आपली नवी मुंबईही अपवाद नाही. नवी मुंबई शहरात आजही बुस्टर डोस न घेतलेले ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष व अन्य घटक आजही मोठ्या संख्येने आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून जगामध्ये कोरोना उद्रेकाच्या बातम्या पाहिल्यावर नवी मुंबईकर बुस्टर डोससाठी माता बाल रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रात हेलपाटे मारु लागले आहेत. तथापि त्या ठिकाणी बुस्टर डोस शिल्लक नाहीत. तसेच खासगी रुग्णालयातही स्फुटनिक डोस उपलब्ध नाही. त्या ठिकाणी महापालिका रुग्णालयात जाण्यास सांगत आहेत. अनेक शालेय बालकेही आजारी असणे अथवा अन्य कारणांमुळे कोविड लस घेवू शकलेले नाहीत. तथापि कोरोना महामारीच्या संभाव्य पार्श्वभूमीवर माता बाल रुग्णालयात बुस्टर डोस तसेच शालेय बालकांसाठी कोरोना लससाठी स्वतंत्र अभियान राबविण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.