नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील भुखंड क्रमांक १ वरील पालिकेच्या सार्वजनिक उद्यानात ओपन जीम सुरु करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर दोनमध्ये भुखंड क्रमांक १ वरील महापालिकेचे उद्यान आहे. नेरूळ सेक्टर २ तसेच जुईनगरमधील स्थानिक रहीवाशी उद्यानात येत असतात. या उद्यानात ओपन जीम निर्माण केल्यास स्थानिक रहीवाशांना, मुलांना व्यायाम करणे शक्य होईल. महिलांना व्यायामाची आवड असतानाही घरातील कामामुळे अथवा नोकरी-व्यवसायामुळे जीममध्ये जाणे शक्य होत नाही. त्या महिलांनाही या उद्यानात सकाळच्या वेळी येवून व्यायाम करणे शक्य होईल. सध्या विविध नवनवीन आजार येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर निरोगी शरीर व निरोगी शरीरासाठी व्यायाम आज आवश्यक आहे. या उद्यानात ओपन जीम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.