Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६६५७३ / ८३६९९२४६४६
नवी मुंबई : कोपरखैराणे प्रभाग ४२ मधील सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात कमी दावाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यासह दूषित पाण्याची समस्या दूर करण्याची लेखी मागणी समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोपरखैराणे, महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसराचा समावेश होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. अनेकदा काही ठिकाणी एक-दोन दिवसही पाणी येत नाही. पाण्याचे लोडशेडींग असल्यावर लोडशेडींग संपल्यावरही दुसऱ्या दिवशीही पाणी येत नाही. महापालिका प्रशासनाचे विशेषत: नवी मुंबईकरांच्या स्वमालकीचे मोरबे धरण असताना कोपरखैराणेवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.
याशिवाय पावसाळा सुरू झाल्यापासून या प्रभागात ठिकठिकाणी दूषित व पिवळसर पाणी येत आहे. पाणी उकळून व गाळून घेतले तर पाणी पिवळसरच दिसते. या दूषित पाण्यामुळे अनेक रहीवाशी आजारीही पडले आहे. दूषित पाण्याने लोक त्रस्त झाले आहे. आपण स्वत: या परिसरात येवून पाहणी अभियान राबवून स्थानिक रहीवाशांशी चर्चा केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. प्रभाग ४२ मधील रहीवाशांना कमी दाबाचा पाणीपुरवठा व होत असलेला दूषित पाण्याचा पुरवठा या समस्येचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.