नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनातील सेवानिवृत्त माजी अधिकारी व कर्मचारी वर्गातील लोकाभिमुख असलेले व्यक्तिमत्त्व राजेंद्र सोनवणे यांची इंटक संलग्न असलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
या नियुक्तीपत्रात नवी मुंबई महापालिका प्रशासनातील आपली प्रदिर्घ सेवा आणि तळागाळातील कर्मचाऱ्यांचे आपले असलेले जिव्हाळ्याचे संबंध तसेच कर्मचारी वर्गाविषयी आपली असलेली तळमळ पाहता आपली नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्या अनुभवचा फायदा कर्मचारी वर्गाला होईल आणि आपल्या माध्यमातून कर्मचारी वर्गाच्या समस्या मार्गी लागतील, तसेच आपल्या मार्गदर्शनाचा कामगार वर्गाला फायदा होईल, अशी आशा असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.
मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयालगत महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनात राजेंद्र सोनवणे यांनी सक्रिय योगदान दिले. व्यासपिठावर बसून उपोषण आंदोलनात दिवसभर सहभागी होवून कामगारांना मार्गदर्शनही केले.