नवी मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय माथाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून नवी मुंबईत पाऊस पडत आहे. पावसाळा आणि नवी मुंबईत असणारे साथीचे आजार हे वर्षांनुवर्षाचे समीकरण जुळलेले आहे. दोन महिन्यात पडणाऱ्या पाऊसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजी मार्केट, धान्य मार्केट, किराणा दुकान मार्केट या पाचही मार्केटमधील तसेच बाजार समिती उपसचिवांच्या कार्यालयात आणि बाजार समिती मुख्यालयात साथीचे रुग्ण दिसू लागले आहेत. साथीच्या आजाराचे रूग्ण खासगी दवाखाने तसेच मेडिक्लेम असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याने पालिका दरबारी या रुग्णांची नोंद होत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजी मार्केट, धान्य मार्केट, किराणा दुकान मार्केट या पाचही मार्केटमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आजार होवू नये आणि आजार झाल्यावर काय करावे याबाबत जनजागृती शिबिराचेही आयोजन करणे आवश्यक आहे. याशिवाय नागरी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून पाचही मार्केटमधील गाळ्यागाळ्यावर जावून, बाजार समिती प्रशासनातील मुख्यालय तसेच उपसचिवांच्या कार्यालयात जावून साथीच्या आजाराबाबत लोकांशी सुसंवाद साधणे आवश्यक आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजी मार्केट, धान्य मार्केट, किराणा दुकान मार्केट या पाचही मार्केटमध्ये आरोग्य शिबिरांचे व जनजागृती शिबिर आयोजनाचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.