३१ ऑगस्टपर्यत वेतनवाढ करण्याचे दिले आश्वासन
नवी मुंबई : ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह अन्य समस्या सोडविण्यासाठी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने तसे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी वारंवार महापालिकेला निवेदने देवून, शिष्टमंडळे नेवून चर्चा करूनही आश्वासनाशिवाय पदरात काहीही पडले नव्हते. परंतु ऑगस्ट क्रांतिदिनी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिका मुख्यालयलगतच कामगारांनी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करताच नवी मुंबई महापालिका प्रशासनाला जाग आली आणि ३१ ऑगस्टपर्यत कामगारांची वेतन वाढ करण्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केल्यानंतरच बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित केल्याची माहिती कामगार नेते रविंद्र सावंत यांनी दिली.
ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह अन्य समस्या सोडविण्यासाठी आश्वासनाशिवाय काहीही पदरात पडत नसल्याने कामगार नेते रविंद्र सावंत यांनी मंगळवारी, ऑगस्ट क्रांतीदिनी महापालिका मुख्यालयालगत बेमुदत उपोषण आंदोलनास सुरूवात केली. या आंदोलनात सुरूवातीपासून ३०० ते ३५० कर्मचारीही बेमुदत उपोषणास बसले. कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी कार्यक्रमात भाषणातून आपल्यावर होत असलेला अन्याय, असुविधा, कमी वेतनात होत असलेले शोषण याचा पाढा वाचला. व्यासपिठावर बसलेल्या उपोषणकर्त्यांनी व खाली रस्त्यावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी घोषणा देत आंदोलनाची धार वाढविली. अनेकदा पावसाचा अडथळा येवूनही आंदोलनकर्ते कर्मचारी पावसातही रस्त्यावर बसूनच होते.
कामगारांचा संताप व कामगार नेत्यांनी सुरू केलेले उपोषण आणि दिवसभरात आंदोलनस्थळी नवी मुंबईकरांनीही मोठ्या संख्येने भेट देत आंदोलनकर्त्यांचा उत्साह वाढवित आंदोलनाला समर्थन दिले. सांयकाळी आंदोलन स्थळी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रशासन उपायुक्त आणि शिक्षण विभाग उपायुक्त अशा दोन उपायुक्तांनी भेट दिली व चर्चेसाठी अतिरक्त आयुक्तांनी त्यांच्या दालनात बोलविले असल्याचा प्रशासनाच्या वतीने निरोप दिला. यावेळी चर्चेसाठी कामगारांच्या वतीने कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर अविनाश लाड, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अंकुश सोनवणे, वाहन विभागाचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, महाराष्ट्र कर्मचारी यांचे उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, महाराष्ट्र कामगार कंत्राटी कामगार सेलचे अध्यक्ष संजय सुतार, संघटनेचे सचिव मंगेश गायकवाड व प्रत्येक विभागातील एकेक कामगार असे तर प्रशासनाच्या वतीने उपायुक्त प्रशासन शरद पवार, उपायुक्त शिक्षण विभाग घनवट आणि अतिरिक्त आयुक्त मासाळ हे सहभागी झाले होते. अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात एक तास चर्चा झाली.
शिष्टमंडळाची पालिका प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत ठोक मानधनावरी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ व अन्य समस्या निवारणासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ कशाप्रकारे करता येईल, याबाबत ही समिती ३१ ऑगस्टपर्यत पालिका आयुक्तांना अहवाल देणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाने लवकरच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, आपण उपोषण सोडावे अशी विनंती प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.
बैठकीत कामगार नेते रविंद्र सावंत व अन्य कर्मचारी प्रतिनिधींनी उलट सुलट प्रश्न उपस्थित केले असता, प्रशासनाकडून ३१ तारखेपर्यत निर्णय घेतो असे आश्वासन देण्यात आले.
रवींद्र सावंत एक मुद्दा केला, तो म्हणके प्रशासन दोन महिन्यापूर्वी २२ कर्मचाऱ्यांना थेट ३५ हजार रुपये पगारवाढ करते, त्या पगारवाढीचा निकष काय? याचा खुलास मिळावा. कशाप्रकारे प्रशासनाने या ठराविकच कर्मचाऱ्यांचे कोणत्या आधारावर ३५ हजार रुपये वेतन केले. वेतनवाढ ठोक मानधनावरील सर्वच कर्मचाऱ्यांची झाली पाहिजे, असे सावंत यांनी सांगितले.
प्रशासनाने २०१७ पासून लिपिक टंकलिपिक आणि बहुउद्देशीय कामगार काही संवर्गातील कामगारांना कुशल अर्ध कुशल संवर्गामध्ये टाकलेले आहे. कुशल अर्ध कुशल हा विषय कंत्राटी कामगारांमध्ये येतो. या चर्चेदरम्यान रविंद्र सावंत यांनी विविध आस्थापनेतील अन्य कर्मचाऱ्यांच्याही समस्येचा उहापोह केला. चर्चेमध्ये परिवहनचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर उपस्थित नव्हते. प्रशासन उपायुक्त शरद पवार यांनी कडूस्करांशी चर्चा करून परिवहनमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे प्रकरण मार्गी लावू, असे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांचा ऑनड्यूटी अथवा कामावर येताना अथवा कामावरून घरी जाताना अपघात झाल्यावर कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची मागणीही चर्चेत रविंद्र सावंत यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त मासाळ, प्रशासन उपायुक्त शरद पवार व शिक्षण विभागाचे उपायुक्त घनवट यांनी दिले. पालिका आयुक्तांशीही बैठकीत भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली. आयुक्तांनीही मला थोडा वेळ द्या, सर्व समस्या मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटिवार यांनीही आयुक्त नार्वेकरांशी भ्रमणध्वनीवरून आंदोलनाबाबत व कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यांनाही पालिका आयुक्तांनी लवकरच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे आश्वासन दिले. त्यानंतरच कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषन आंदोलन कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्थगित केले.