वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल ज्या पद्धतीने अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरण्यात आली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले भुजबळ हे मागासवर्गीय समाजाचे आहेत म्हणूनच त्यांच्याबद्दल शिविगाळ करणारी भाषा वापरण्यात आली आहे, ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. भुजबळांबद्दल जी भाषा वापरली त्याबद्दल सरकारने माफी मागावी आणि हिम्मत असेल तर सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाडांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-भाजपा-पवार सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, सरकार राज्यात जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच मराठा अध्यादेशाला विरोध असून ते कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा काय तमाशा चालवला आहे? भाजपाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले आहे यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आमची लढाई सुरु आहे, असे पटोले यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. चर्चेत आंबेडकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत, त्यांचे व आमचे अनेक मुद्दे समान आहेत यातूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय झाला असून किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल, या समितीत सर्व घटक पक्षांच्या सदस्यांचा समावेश असेल. आठ दिवसात ही समिती अहवाल सादर करेल व त्यानंतर पुढील आठवड्यात मविआच्या बैठकीत जागा वाटपावरही चर्चा होईल. जागा वाटपावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, सर्व ४८ जागा मविआ लढणार असून सर्वात जास्त जागांवर मविआचा विजय होईल.
पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, इंडिया आघाडीत बिहारमध्ये जे घडले ते सर्वांना माहित आहे, नितीशकुमार यांनी यापूर्वीही असा दलबदल केला आहे. बिहारमध्ये काँग्रेस व लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाची मोठी ताकद आहे म्हणूनच भाजपाचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे परंतु भाजपाला याचे परिणाम भोगावे लागतील, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.