नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त सानपाडा येथे ‘सानपाडा दिंडी सोहळा २०२४’ बुधवार, दि. १७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला असून ‘येताय ना वारी’ला या अभियानांतर्गत सानपाडावासियांना या वारीत सहभागी होण्याचे आवाहन सानपाडा नोडमधील भाजपाचे नेते पांडुरंग आमले यांनी केले आहे.
साईभक्त महिला फांऊडेशन, साईभक्त युवा, सानपाडा गॉर्डन कट्टा परिवार, विविध योग ग्रुप व वारकरी सांप्रदाय मंडळ सानपाडा, माऊली भजन मंडळ सानपाडा, विरंगुळा केंद्र यांच्या वतीने या येथे ‘सानपाडा दिंडी सोहळा २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सानपाडा नोडमध्ये ही दिंडी काढण्याय येणार आहे. पारंपारिक वेशभूषा, महिला लेझिम पथक, पालखी, तुळशी वृंदावन, टाळकरी यांच्या मदतीने सानपाडा नोडमध्ये दिंडीच्या माध्यमातून विठू माऊलीचा गजर होणार आहे. या वारकरी दिंडीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सुंदर दर्शन व शालेय विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा पहावयास मिळणार आहे. सानपाडा सेक्टर दोनमधील शिवमंदिरापासून या दिंडी सोहळ्यास सुरुवात होणार असून संपूर्ण सानपाडा नोडमधून दिंडी काढल्यानंतर सानपाडा सेक्टर आठमधील गणेश मंदिराजवळ या दिंडींचा समारोप होणार आहे.
गेल्या काही वर्षापासून या दिंडी सोहळ्याचे सानपाडा नोडमध्ये आयोजन होत असून कामातील व्यस्तपणामुळे अनेक भाविकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्या भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, पालखी सोहळ्यात सहभागी होता यावे आणि आपल्याच परिसरात विठू माऊलीचा गजर व्हावा या हेतूने आयोजित केलेल्या या दिंडीमध्ये सानपाडावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी केले आहे.