नवी मुंबई : गजापुर (विशालगड) येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सखोल चौकशी करावी अन्यथा नवी मुंबईसह रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा लेखी इशारा एमआयएमचे नवी मुंबईसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गचे प्रभारी व एमआयएम विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
गजापुर (विशालगड) येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. बॅरिस्टर असदुद्दीन औवैसीसाहेब, प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभाग प्रभारी या नात्याने मी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकारातील सत्य पडताळून पहावे, तसेच याबाबत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. गाजापुर (विशालगड) मध्ये झालेली घटना निंदणीय आहे. ज्यामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली विशेष करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना (मस्जिद, दर्गा) व धार्मिक पुस्तके (पवित्र कुराण) यांची विटंबना करण्यात आली. तसेच विशेष करून मुस्लिम समाजाच्या घरांना टार्गेट करण्यात आले. या झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध एआयएमआयएमच्या वतीने करण्यात येत आहे. तरी महोदय आमच्या खालील मागण्यांबाबत आपण प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
UAPA कायद्याअंतर्गत हलेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, झालेल्या हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाच्या घरांची शासनाने नुकसान भरपाई द्यावी, हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या प्रत्येकी जखमीला ५ लाख रुपये राज्य सरकारतर्फे देण्यात यावेत. मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ पारित करण्यात यावे, या सर्व घटनेची सखोल चौकशी सीआयडीमार्फत करण्यात करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
आपण यावर सकारात्मक विचार नक्कीच कराल, याची आम्हाला खात्री आहे. मात्र जर वरील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एआयएमआयएम पक्षाच्यावतीने नवी मुंबईसह, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा हाजी शाहनवाझ खान यांनी दिला आहे.