नवी मुंबई : जुईनगर नोड व नेरूळ सेक्टर दोन-चार परिसरातील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने जोर चांगलाच पकडला आहे. पाऊसाने जोर पकडल्यावर सर्वप्रथम पदपथावर त्याचा प्रभाव पडतो. नेरूळ सेक्टर दोन-चार तसेच जुईनगर नोडमधील पदपथ आताच निसरडे झाले असून काही ठिकाणी शेवाळ पकडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व महिला चालताना पदपथावर घसरुन पडण्याच्या घटना घडल्या आहे. चालताना कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगताना महापालिका प्रशासनाने जुईनगर नोड व नेरूळ सेक्टर दोन-चार परिसरातील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.