जयेश खांडगेपाटील यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
जुन्नर (प्रतिनिधी) : जुन्नर तालुक्यातील वाढत्या चोऱ्याचा तात्काळ छडा लावण्याचे पुणे ग्रामीण पोलिस आयुक्तालयाला निर्देश देण्याची लेखी मागणी जुन्नर तालुक्यातील पिंपळगावचे सामाजिक कार्यकर्ते जयेश खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाने दडी मारल्याने जुन्नर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोणने टेहळणी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे ड्रोण कोठून येतात, कोठे जातात, याचा कोणताही सुगावा स्थानिक पोलिसांना अजूनही लागलेला नाही व ग्रामस्थांनाही उलगडा झालेला नाही. यामुळे तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. ड्रोणची टेहळणी व वाढत्या चोऱ्या यामुळे जुन्नर तालुक्यातील रहीवाशी भयभीत झालेले आहेत. जुन्नर तालुक्यात पोलीसांची गस्त वाढविण्याचे, ड्रोन टेहळणीचा छडा लावण्याचे व चोरांचा बंदोबस्त करण्याबाबत आपण पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाला तातडीने निर्देश देण्याची मागणी जयेश खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.