सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : युवक, युवतींना त्यांच्या स्वप्नातील रोजगार प्राप्त करून देणारा विनामूल्य महारोजगार मेळावा संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वारकरी भवन, वायएमसीए मार्ग, सेक्टर ४ सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या महारोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील ५० कंपन्या सहभागी होणार असून त्यामधून पाच हजारांपेक्षा अधिक रोजगार आणि स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत नऊ यशस्वी महारोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून यंदाचा हा दहावा महारोजगार मेळावा आहे.
या महारोजगार मेळाव्यामध्ये नवी मुंबई आणि मुंबईमधील बँकिंग, बॅक ऑफिस, बीपीओ, विमानतळ, माझगाव डॉक, पेशंट केअर, आयटी, आयटीआय, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स ऍन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. अनेक शासकीय महामंडळ सहभागी होणार आहेत. माजी सैनिक आणि निवृत्त पोलिसांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत तर कॉलेज विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी इंटर्नशिपच्या संधी आहेत. एनएसडीसी फ्री ट्रेनिंग बद्दल विशेष माहिती देण्यात येणार आहे. रोजगार, उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधीची माहिती आणि या संधी प्राप्त करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन पार पडणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या तसेच महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यशस्वी मुलाखतीसाठी उमेदवारांना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. करियर विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. मेळाव्यात ज्यांना नोकर्या मिळणार आहेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. या विनामूल्य महारोजगार मेळाव्याचा लाभ तरुण आणि तरुणींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले आहे. महा रोजगार मेळाव्यामध्ये नाव नोंदणीसाठी किंवा याविषयी अधिक माहितीसाठी ०२२-४५११८४९९/८८५०५८८०६९.