श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापूर विधानसभेत काय होणार, कोण जिंकणार, कोण पराभूत होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाआघाडीचे उमेदवार व माजी आमदार संदीप नाईक, महायुतीच्या उमेदवार व विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि शिवसेनेचे उपनेते व निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून सहभागी झालेल विजय नाहटा अशी तिरंगी लढत होत असून अन्य पक्षाचे उमेदवार तसेच तिकिट न मिळालेले काही नाराज उमेदवार निवडणूक लढवत आहेत. खरी लढत मंदाताई म्हात्रे, संदीप नाईक व विजय नाहटा अशी तिरंगी होत असून फोडाफोडीच्या राजकारणातील घडामोडी गतीमान झाल्या आहेत. जो प्रचार यंत्रणेत गाफील राहणार, तसेच ज्याचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते फुटणार अथवा पक्षात राहून दुसऱ्याचे काम करणार, त्या उमेदवाराचा या मतदारसंघात पराभव निश्चित मानला जात आहे.
संदीप नाईकांची पर्यायाने महाविकास आघाडीची संघटना बांधणी, कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची मजबूत फळी, पाठीशी माजी नगरसेवकांचे पाठबळ असे सुखद चित्र असले तरी २०१४च्या निवडणूकीच्या वेळेसही हेच चित्र होते, ही वस्तूस्थिती नाकारुन चालणार नाही. भाजपा उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे स्वत:चे विशिष्ट नेटवर्क असल्याने मतदारसंघातील प्रत्येक पालिका प्रभागातील घडामोडींची इंत्यभूत माहिती त्यांना तात्काळ प्राप्त होते. अन्य उमेदवारांच्या तुलनेत कोठे नाराजी आहे, कोणाला आपणाकडे वळविता येईल, या खेळीमध्ये विद्यमान उमेदवारांमध्ये भाजपाच्या सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या गळाला कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे काही जण लवकरच लागणार असल्याचे बोलले जात आहे. आरएसएस मंदाताईंच्या विजयासाठी सक्रिय झाली असून वस्ती बैठका, घरोघरी भेटी यासह अन्य प्रचारावर आरएसएसकडून भर दिला जात आहे. अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी भागातील मतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या प्रचारयंत्रणेत सहभागी असलेले सानपाडा व नेरूळमधील घटक राष्ट्रवादी व भाजपामधील अनेक घटकांना फोडण्यात सक्रिय झाले असून भेटीगाठी व फोन अ फ्रेंड अभियान जोरदारपणे राबविले जात आहे. फोन अ फ्रेंड अभियान यशस्वी झाल्यास थेट २२०२ मध्ये नेत्यांची भेट असा कार्यक्रम सुरु आहे.
शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे महाविकास आघाडीच्या विजयासाठी बेलापुर मतदारसंघात कमालीचे सक्रिय झाले असून शिवसेना माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांच्या दीड दीड तास बैठका घेवून प्रचार अभियानाचा आढावा घेत आहेत. बेलापूर मतदारसंघातील कॉंग्रेसच्या नेरूळमधील एक-दोघांचा अपवाद वगळता सर्वच संदीप नाईकांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.
मनसेचे गजानन काळे यांनी सोशल मीडियात प्रचारात आघाडी घेतली असून रॅलीही सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार डॉ. मंगेश आमले अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असले तरी त्यांना प्रत्यक्षात किती पाठिंबा आहे, हे २३ तारखेला मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संदीप नाईकांच्या प्रचारात कमालीचा आक्रमक व सक्रिय झालेला आहे. भाजपाकडून फोडाफोडीचे व राष्ट्रवादीतील नाराजांना हेरण्याचे जोरदार प्रयत्न सुरु असून काहीजण मंदाताई म्हात्रे यांच्या गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू शिंदे हे नुकतेच भाजपात दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीची ताकद व बोलबाला पाहता संदीप नाईकांचा विजय निश्चित मानला जात असला तरी फोडाफोडीचे व पडद्यामागून गद्दारीचे राजकारण व हिशोब चुकता करण्याची काही लोकांची मानसिकता यापासून सावधता न बाळगल्यास ही संदीप नाईकांसाठी धोक्याची घंटा ठरु शकते. २०१४च्या विधानसभा निवडणूकीतर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी तत्कालीन परिस्थितीत राष्ट्रवादीतील काही मातब्बरांना आपलेसे केले होते.
कॉग्रेसमधून भाजपात व भाजपातून संदीप नाईकांसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेल्या नेरूळ पूर्वमधील माजी नगरसेविका मीरा पाटील यांनी त्यांच्या प्रभागात घरटी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्या मागे न फिरता आपल्या प्रभागात प्रचार जोरदार करुन त्यांना लीड मिळवून द्या असा नकळत संदेश दिला आहे.
आपल्या विजयासाठी इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना, माजी नगरसेवकांना फोडण्याचे अथवा त्यांना थंड करण्याच्या प्रयत्नांना बेलापूर मतदारसंघात पडद्याआडून गती आली आहे. जनतेत संपर्क व आपल्या पक्षातील तसेच मित्र पक्षातील घडामोडीवर नजर ठेवण्याचे अग्निदिव्य उमेदवारांना पार पाडावे लागणार आहे. बेलापूर मतदारसंघात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाला व दिवाळी फराळाला गती मिळाल्याने कोणावर विश्वास टाकायचा व कोण विश्वासघात करेल याचा शोध घेण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. नजर हटी तो दुर्घटना घटी हे बेलापूर मतदारसंघातील मातब्बर उमेदवारांबाबत होण्याची दाट शक्यता आहे.