नवी मुंबई : देशातील सर्वोत्तम शहर नवी मुंबईला बनवण्याचे वचन बेलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी आपल्या दिले आहे. उत्तम नागरी सुविधा, स्वच्छ, हरित व विकसित शहर करण्याचा संकल्प त्यांनी वाशी येथे अब्बॉट हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. पालिकेचे माजी आयुक्त आणि आयएएस अधिकारी म्हणून नागरी समस्यांची असलेली जाण व त्या सोडविण्याचे कसब नाहटा यांनी आपल्या जाहीरनाम्यातून दाखवून दिले आहे.
‘जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे यावेळी नक्कीच बाजी मारू,’ असा आत्मिश्वास विजय नाहटा यांनी व्यक्त केला. तसेच घराणेशाही असलेले, प्रशासनाचे कोणतेही ज्ञान नसलेले, भ्रष्टाचार करणारे, नैतिकता नसलेले उमेदवार जनतेला नको आहेत. तर विकासाचा दृष्टिकोन ठेवणारे, भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नसणारे, स्वच्छ चारित्र्याचे, संस्कारी लोक हवे आहेत. नवी मुंबईत होणाऱ्या विकासामुळे निर्माण होणारे प्रश्न विचारात घेऊन त्यावर मात करण्याची क्षमता असलेला, दीर्घ प्रशासकीय व राजकीय – सामाजिक अनुभव असणारा उमेदवार म्हणून जनता मला यावेळी नक्कीच निवडून देईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात नाहटा यांनी सांगितले.
नवी मुंबईत आपण चार वर्षे आयुक्त होतो त्यामुळे येथील समस्या व त्यावरील उपाय यांची सखोल कल्पना आहे. त्यावेळी मोरबे धरणाची उभारणी, शाळा, हॉस्पिटल, सिमेंट रस्ते, विरंगुळा केंद्रे अशा अनेक नागरी सेवा सुविधा निर्माण केल्या, त्यामुळेच शहराला केंद्र आणि राज्याचे पुरस्कार मिळाले. गेल्या चार वर्षात जी कामे झाली ती पुढील दहा वर्षात झाली नाहीत. राजकीय नेत्यांनी फक्त फोटो काढले. फोटो काढण्याचे काम ते करतात पण अंमलबजावणी कशी करायची त्याचा अनुभव मला आहे ,असे ते म्हणाले.
नाहटा फाउंडेशनद्वारे हजारो लोकांना मदत
नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो लोकांना मदत पुरवली आहे. विकलांग, महिला, शालेय विद्यार्थी, गरिबांना मदत व गरजूंना वैद्यकीय मदत, वृद्ध व्यक्तीना शासकीय योजनांचा लाभ देणे, असे अनेक उपक्रम राबविले. जनतेचे अनेक प्रश्न सोडवले. त्यामधून जनतेशी गेल्या दहा वर्षात जोडलो आहे.
सर्वपक्षीय पाठिंबा
नवी मुंबईत पक्षांतरमुळे प्रचंड नाराजी आहे. तुतारी मध्ये दोन गट परस्पर विरोधी आहेत. तर विद्यमान आमदार जनतेला वेळ देत नाहीत. त्यामुळे जनतेला सतत उपलब्ध असणारा, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन सोडविणारा नेता हवा आहे. त्यामुळे मला सर्वच पक्षांचे पदाधिकारी, विविध संघटना आणि जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच विजयाची मला खात्री आहे, असेही नाहटा यांनी पत्रकारांना सांगितले.
प्रमुख संकल्प
* नवी मुंबई शहरातील पार्किंगची सुविधा निर्माण करणे.
* स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे घरे नियमित करण्याच्या जीआरची अंमलबजावणी करणे.
* मोडकळीस इमारतींचा पुणे विकास करण्यासाठी एक खिडकी योजना राबवणे.
* सिडको भूखंडावरील सोसायटीना फ्री होल्ड करताना कनवर्जन शुल्क कमी करणे.
* कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे.
* कंडोनियम मध्ये नागरी सुविधा पुरवणे.
* पासपोर्ट कार्यालय सुरू करणे.
* सुसज्ज अभ्यासिका उभारणे.
* बेरोजगार युवकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार संधीची माहिती देणारे केंद्र उभारणे.
* जुनी धार्मिक स्थळे नियमित करणे.
* भूमिगत वीज वाहिन्या टाकणे.
यासह एकूण २६ संकल्प त्यांनी केले आहेत.