नवी मुंबई : बेलापूर मतदारसंघातील राजकीय घडामाेडींकडे व प्रचाराकडे ठाणे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे. महायुतीच्या उमेदवार आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक, अपक्ष उमेदवार विजय नाहटा आणि मनसेचे गजानन काळे अशी चौरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीमध्ये उबाठा शिवसेना प्रचारात जुन्या व नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या तुलनेत आक्रमकरित्या प्रचारयंत्रणेत सक्रिय सहभाग घेत असून कॉंग्रेसनेही आपली ताकद निवडणूक प्रचारात कामाला लावली आहे. संदीप नाईकांसमवेत राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या नवीन घटकांमधील बहूतांश लोकांचा हायटेक प्रचारावर भर असल्याने जुन्या राष्ट्रवादीसह शिवसेनाही नाराजी व्यक्त करु लागली आहे. २०१४ मधील निसटत्या पराभवातूनही नाईक समर्थंक कोणताही बोध घेत नसल्याचे आता जुनी राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा गट तसेच कॉंग्रेसवालेही उघडपणे बोलू लागले आहेत.
लोकसभा निवडणूकीत ठाण्यातून राजन विचारेंची फारशी आर्थिक रसद आलेली नसताना उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी मतदान चांगल्यापैकी घेतले होते. संदीप नाईकांसमवेत आलेल्या भाजपामधील नव्या राष्ट्रवादीच्या घटकांचा हायटेक प्रचारावर थोडक्यात चमकेश प्रचारावर भर असल्याचे महाविकास आघाडीत उघडपणे बोलले जावू लागले आहे. नावाला चार-पाच कार्यकर्ते पाठवायचे आणि फोटोसेशन करुन सोशल मीडीयावर टाकून नाईकांची दिशाभूल करण्याचे उद्योग बेलापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदारसंघात सुरु असल्याचे महाविकास आघाडीमधील शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी जुना गट आणि कॉंग्रेसच्या घटकांमध्ये उघडपणे बोलले जात आहे. तसेच राष्ट्रवादीमधील नवीन गट हा जुन्या गटाला तसेच शिवसेना उबाठाला विश्वासात न घेता प्रचारात मनमानी तसेच एकला चलो रे वागत असल्याचा संतापही काही प्रभागांमध्ये महाविकास आघाडीतील घटक उघडपणे व्यक्त करु लागले आहेत.
शिवसेना उबाठाच्या प्रचाराच भर हा हायटेक नसून ग्रासरुटचा राहीलेला आहे. मतदारसंघात एकदा नव्हे तर दहा-बारा वेळ थेट घरटी जनसंपर्कावर शिवसेना उबाठाकडून भर देण्यात येत आहे. शिवसेना उबाठाचे पदाधिकारी, शाखाप्रमुख या घरटी अभियानात शिवसैनिकांबरोवर फिरत असतात. राष्ट्रवादीच्या नव्या हायटेक विचारसरणीचे शिलेदार केवळ नाईकांचे कोणी आले की फिरतात व इतर वेळी चार-पाच कार्यकर्ते प्रचाराला पाठवतात. स्वत: मात्र घरटी प्रचार यंत्रणेत सहभागी होत नाही. केवळ फोटो सोशल मीडियावर टाकून प्रचार जोरात सुरु असल्याचे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. २०१४ ला हेच राष्ट्रवादीचे शिेलेदार राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार गणेश नाईकांसमवेत होते. असाच हायटेक प्रचार सुरु होता. परिणामी राष्ट्रवादीला १२०० ते १४०० मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. आताही बेलापूर मतदारसंघात २०१४च्या प्रचाराची पुनरावृत्ती हायटेक धार्जिण्या अनेक घटकांकडून विविध प्रभागांमध्ये सुरु आहे.
महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गट, काॅग्रेस, जुनी राष्ट्रवादी संदीप नाईकांच्या प्रचारात कमालीची आक्रमक झाली आहे. उबाठा शिवसेनेच्या विठ्ठल मोरेंपासून शिवसेना पदाधकारी, शाखाप्रमुख व तळागाळातील शिवसैनिकांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. उबाठा गटाशी फारकत घेणाऱ्या विजय नाहटांना धडा शिकविण्यासाठी शिवसैनिक व उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी उत्साहात प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झाले आहेत. प्रचाराला आता अखेरचे आठ दिवस राहीले आहेत. विजय नाहटा व मंदाताई म्हात्रे यांचे शिलेदार महाविकास आघाडीतील नाराज घटकांना आपलेसे करण्यात कमालीचे स्वारस्य दाखवित आहेत. कोण कोणाशी निष्ठावंत आहे व पुढचे काही दिवस राहील याचा कोणालाही भरवसा देता येत नाही. त्यामुळे संदीप नाईकांना विजयी व्हायचे असेल तर नव्या राष्ट्रवादीवाल्यांना घरटी प्रचारात उरलेल्या आठ दिवसात सहभागी करावे लागेल असे महाविकास आघाडीतील घटक उघडपणे सांगत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकजीव झाल्याचे बेलापुर विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईकांनाच आता पुढाकार घेऊन नव्या राष्ट्रवादीतील आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना, माजी नगरसेवकांना हायटेक नको आता घरटी प्रचार करण्याचे निर्देश देण्याची वेळ आली आहे.