स्वयंम न्यूज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : गेल्या एक दशकभरापासून वाशीतील विष्णूदास भावे ज्या क्षणाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता, त्या क्षणाची सोमवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पूर्तता होत आहे. नवी मुंबई शहराची जडणघडण ज्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली झाली, ज्या नेतृत्वाने नवी मुंबई शहर विकसित केले, आयुष्यभर ज्या कर्तृत्वाने तळागाळातल्या जनसामान्यांची नि;स्वार्थी भावनेने नवी मुंबईकरांची पाच दशकाहून अधिक काळ सेवा केली आहे, त्या लोकनेते, नवी मुंबई शिल्पकार असलेलले लोकनेते गणेश नाईक यांचा जनता दरबार सोमवारी भरणार आहे.
लोकनेते गणेश नाईकांचा जनता दरबार आजवर केवळ ठाणे जिल्ह्यातील जनतेपुरतेच आयोजित असला तरी महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक तसेच इतर विविध क्षेत्रातील घटकांनाही हा जनता दरबार परिचित आहे. गणेश नाईकांनी मंत्रीपदाचा वापर, लाल दिव्याचा गाडीचा वापर आजवर केवळ स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी नाही तळागाळातल्या लोकांच्या जनकल्याणासाठी, पीडिताच्या समस्या सोडविण्यासाठी केला असल्याचे महाराष्ट्रातील जनतेने १९९५ पासून पाहिले आहे, अनुभवले आहे. सर्वसामान्य लोक आपल्या समस्या घेऊन प्रशासनदरबारी हेलपाटे मारत असतात. लालफितीच्या शासकीय रहाटगाड्यामध्ये त्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो. अनेकदा अधिकारी वर्ग उपलब्ध होत नाही. न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांचा प्रशासनावरील विश्वास उडतो. सर्वसामान्य जनतेने प्रशासनाकडे न जाता, हेलपाटे न मारता प्रशासनाने जनतेकडे जावे, जनतेचा व प्रशासनाचा थेट संपर्क व्हावा, त्यांच्यात सुसंवाद व्हावा याहेतूने लोकनेते गणेश नाईकांनी जनता दरबार सुरु केला आहे. हा जनता दरबार केवळ प्रसिद्धी मिळण्यासाठी नसतो तर तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांची कामे करण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्यासाठी असतो, हेच गणेश नाईकांनी १९९५ पासून आयोजित केलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून दाखविले आहे.
गणेश नाईक आणि नवी मुंबई हे एक वेगळे रसायन आहे. गणेश नाईक यांची उभी हयात नवी मुंबई शहराच्या विकासासाठी आणि नवी मुंबईकरांच्या जनकल्याणासाठी समर्पित झालेली आहे. जनता दरबारात प्रशासनातील महापालिका, सिडको, एमआयडीसी, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, शिधावाटप यासह प्रशासनातील सर्वच आस्थापनेतील अधिकारी उपस्थित असतात. जनता दरबारात न्यायाच्या अपेक्षेने तळागाळातील बहूजन वर्ग मोठ्या संख्येने येत असतो. गणेश नाईक सर्वसामान्यांची बाजू घेत प्रशासनाला जाब विचारत असतात, धारेवर धरत असतात, गणेश नाईकांच्या जनता दरबारात चुटकीसरशी अनेक प्रलंबित समस्या मार्गी लागत असतात. जनता दरबार हे नाव असले तरी खऱ्या अर्थांने गणेश नाईकांचा जनता दरबार हा न्यायाचे मंदिर आहे. या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक पीडिताला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या समस्येचे निवारण झाले पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटले पाहिजे, या भावनेने नवी मुंबईचे शिल्पकार व खऱ्या अर्थांने मानवतेचे पुजारी असलेल्या गणेश नाईक स्वत: पुढाकार घेत असतात. हा जनता दरबार खऱ्या अर्थांने सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपिठ आहे. प्रलंबित समस्यांचे निवारण होण्याचे ते एक दालन आहे.
२०१४ नंतर वाशीतील विष्णुदास भावेमध्ये लोकनेते गणेश नाईकांचा जनता दरबार पुन्हा एकदा भरणार आहे. एरव्ही राजकीय मेळाव्यांमध्ये राजकीय घटकांची, विकासकामांमध्ये दहा टक्केपासून थेट ३० ते ३५ टक्के कमिशन ओरबडणाऱ्यांची तसेच आभासी विकासकामांमध्ये थेट ४५ टक्केपर्यंत मलिदा लाटणाऱ्यांची आणि एवढे करुनही ताठ मानेने फिरणारे व्हॉईट कॉलर लोकांची गर्दी विष्णूदास भावे नाट्यगृहाने जवळून पाहिली आहे. अनेक राजकारण्यांची षडयंत्रे, कटकारस्थाने, कोणाला निवडणूकीत पाडायचे, राजकारणात संपवायचे याच्या चर्चाही या नाट्यगृहाने ऐकल्या आहेत. पण सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी लोकनेते गणेश नाईकांच्या होणाऱ्या जनता दरबारासाठी हे नाट्यगृह नव्याने कात टाकून पुन्हा मनापासून स्वागतासाठी सज्ज झाले आहे, आतूर झाले आहे, असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. पुन्हा एकदा तळागाळातील सर्वसामान्य नवी मुंबईकरांची जनता दरबारात गर्दी दिसेल, आपल्यावर कसा अन्याय झाला आहे, न्यायासाठी विलंब झाला आहे याची गाऱ्हाणी लोकनेते गणेश नाई्कांपुढे सादर केली जातील. सर्वसामान्य जनतेच्या न्यायास मिळालेला विलंब पाहून लोकनेते गणेश नाईकांची आगपाखड, प्रशासनाला धारेवर धरणे, खडसावून जाब विचारणे या गोष्टी पुन्हा एकवार अनुभवयास मिळतील. पण हा जनता दरबार केवळ लोकनेते गणेश नाईक, प्रशासनातील अधिकारी, न्यायासाठी येणारी जनता यापुरताच असावा. व्यासपिठावर या घटकांचाच वावर असावा. चमकेश लोकांनी, राजकीय घटकांनी व्यासपिठावर गर्दी न करता सभागृहात सर्वसामान्यांसारखे बसावे एवढीच माफक अपेक्षा नवी मुंबईकरांची आहे.