खांडगेपाटील न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरावयाचे बाकी असेल तर त्यांना दहावी / बारावी परीक्षेचे हॉल तिकीट दिले जात नाही अशा काही तक्रारी नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. सदरची बाब अत्यंत गंभीर असून यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते व त्याच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो.
तरी या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी शाळा व्यवस्थापनांना नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने सूचित करण्यात येते की, एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरणा करणे पालकांच्या काही अडचणींमुळे शक्य होत नसेल तर त्यांच्याशी संवाद साधून शैक्षणिक शुल्क भरणा करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यांना शुल्क भरता यावे याकरिता पर्याय उपलब्ध करुन द्यावेत. तथापि दहावी / बारावी परीक्षेचे हॉल तिकीट न देता त्यांची अडवणूक करु नये. शाळा सोडताना शाळेचा दाखला देण्यापूर्वी शैक्षणिक शुल्क भरून घेण्याचा पर्याय शाळा व्यवस्थापनाकडे उपलब्ध असताना अशा प्रकारे हॉल तिकीट देताना अडवणूक करणे अयोग्य आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
अशा प्रकारची कोणतीही तक्रार करावयाची असल्यास संबधित पालकांनी नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांस ०२२-२७५६७०४३ अथवा उपआयुक्त शिक्षण श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांस ०२२-२७५६७०६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.