नवी मुंबई : सानपाडा सेक्टर सातमधील महापालिकेच्या सिताराम मास्तर उद्यानातील पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यातून व बकालपणातून मुक्त करण्याची लेखी मागणी भाजयुमोचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा परिसर बकालपणातून तसेच पदपथ फेरीविकेत्यांच्या अतिक्रमणातून मुक्त व्हावेत यासाठी आम्ही महापालिका मुख्यालय तसेच तुर्भे विभाग कार्यालयात सातत्याने लेखी पाठपुरावा करत आहोत. सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील रस्ते, पदपथ तसेच सानपाडा सेक्टर सातमधील सिताराम मास्तर उद्यानालगतचे पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त झालेले नाहीत. फेरीवाले आजही राजरोसपणे त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. पालिका प्रशासनाला एकतर ते जुमानत नसावेत अथवा पदपथावरील त्यांच्या अतिक्रमणाला महापालिकेची संमती असावी. लेखी तक्रारी केल्यावर पदपथ, रस्ते फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त करण्याची कारवाई करण्याएवजी तुर्भे विभाग कार्यालय फेरीवाल्यांना आम्ही तक्रारी करतो म्हणून आमची नावे सांगत आहेत. मागील रविवारी (दि. ९ फेब्रुवारी) मानखुर्द-गोवंडी भागातील टपोरी मुले गाडी घेऊन आमचा शोध घेत होतो. आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी पलायन केले. परिसराच्या स्वच्छतेसाठी, बकालपणा घालविण्यासाठी, पदपथावरील, रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा करत असल्याने तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमुळे आज आमच्या जिविताला धोका निर्माण होऊन मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्यासारखेच आमचेही होण्याची भीती निर्माण झालेली आहे. याबाबत आम्ही आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीससाहेबांकडे तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावानिशी तक्रारी करुन त्यांची नार्को व लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी करणार असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
सानपाडा सेक्टर सातमध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर उद्यान आहे. या उद्यानालगतच्या पदपथावर लाकडी ठोकळे, ओंडके पडलेले आहेत. त्यामुळे स्थानिकांना पदपथावरून चालणे अवघड झाले आहे. या उद्यानाच्या संरक्षक भिंतीलगतच्या पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने रहीवाशांना पदपथाऐवजी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. यामुळे उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागत आहे. उद्यानालगतचा पदपथ कायस्वरुपी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त करण्याचे तसेच या पदपथावरील लाकडी ठोकळे, ओंडके उचलून स्थानिकांना दिलासा देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.