नवी मुंबई : डासांच्या वाढत्या घनतेने सानपाडा नोडमध्ये मलेरियाची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सानपाडा कॉलनी, सानपाडा नोड, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात विशेष धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी भाजयुमोचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा कॉलनी, सानपाडा नोड, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात डासांचा उद्रेक वाढला असून परिसरात मलेरिया रुग्णांमध्येही वाढ झालेली आहे. सानपाडा पामबीच परिसरातील टॉवर, सानपाडा गाव, सानपाडा नोडमध्ये प्रत्येक सेक्टरमधील सिडकोच्या तसेच खासगी गृहनिर्माण सोसायट्या व अन्य इमारती, चाळी तसेच पालिकेची उद्याने व क्रिडांगणे येथे डासांमुळे फिरणे अवघड झाले आहे. सांयकाळनंतर घराची दारे व खिडक्या डासांमुळे बंद करुन ठेवावी लागतात. उद्यानामध्ये फिरता येत नाही. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना सानपाडा कॉलनी, सानपाडा नोड, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात तसेच येथील उद्यान व क्रिडांगणामध्ये विशेष धुरीकरण अभियान राबवून स्थानिक रहिवाशांची डासांच्या त्रासातून मुक्तता करावी व त्यांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.