नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त सानपाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रती पंढरपूर अवतरणार असून दिंड्या, पालखी, भजनी मंडळे या वारीमध्ये सहभागी होणार असून यंदा या पालखी, दिंडी सोहळ्याचे सहावे वर्ष आहे. समाजसेवक पांडूरंग आमले, साईभक्त सेवा मंडळ, साईभक्त महिला फांऊंडेशन यांच्या वतीने या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी, दि. ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता सानपाडा सेक्टर ८ मधील गणपती मंदिरापासून या दिंडी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. सेक्टर ७ मधील शिवराज प्लाझा येथे या दिंडी सोहळ्याची समाप्ती होणार आहे. सानपाडा सेक्टर २, ३, ७, ८ मधून हा दिंडी सोहळा काढण्यात काढण्यात येणार आहे. बेलापूरच्या भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यादेखील या दिंडी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
या दिंडीमध्ये स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले वारकऱ्यांच्या वेशात या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. भजन मंडळी, शंभर ते सव्वाशे शालेय मुले, लेझिम पथके, टाळ पथक, राकेश नाईक आर्केटस्ट्राचे कलाकार या दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात. सुमारे तीन चालणाऱ्या या दिंडी सोहळ्यामध्ये अभंग, हरिपाठ होत असल्याने सानपाड्यामध्ये प्रति पंढरपूर अवतरत असल्याचे चित्र निर्माण होत असते. कामामुळे अनेकांना पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणे तसेच वारीत सहभागी होणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना वारीमध्ये सहभागी होण्याचा आनंद घेता यावा आणि परिसरात विठ्ठू रायाचा गजर व्हावा यासाठी या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे पांडूरंग आमले यांनी सांगितले.



