नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त कुकशेत गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये रविवारी, दि. ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात रंगणार आहे. मौजे नवीन कुकशेत देवस्थान समिती व कुकशेत ग्रामस्थांच्या वतीने या आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कुकशेत गावातील भुखंड क्रमांक ५ येथील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सकाळी ६ वाजता विठूरायाचा अभिषेक व पूजेनंतर हा एकादशी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सकाळी पूजेनंतर रात्री उशिरापर्यत भाविकांना दर्शन व फराळ वाटप होणार आहे. दुपारी १२ वाजता व ३ वाजता भजन होणार असून दारावे गावातील नागनाथ हरिपाठ भजनी मंडळाचा दुपारी ४.३० वाजता हरिपाठ तर सांयकाळी ५.३० वाजता कुकशेत गावातील ग्रामस्थांचा हरिपाठ होणार आहे. सांयकाळी ७.३० वाजता मंदिरामध्ये भजन होणार आहे.
या आषाढी एकादशीच्या सोहळ्यात नेरूळ नोडमधील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.



