नवी मुंबई (प्रतिनिधी) :सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील फेरीवाले समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला कडक शब्दांमध्ये निर्देश देवून केलेल्या कारवाईबाबत त्यांच्याकडून लेखी अहवाल मागविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडूरंग आमले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील असलेल्या कियॉस्क परिसरात तसेच कियॉस्कलगतच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे. यामुळे सानपाडामधील स्थानिक रहीवाशांना रेल्वे स्टेशनबाहेर आल्यावर घरी जाण्यासाठी फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा दररोजचा त्रास सहन करावा लागत आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी आम्ही नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करुनही, तुर्भे विभाग अधिकारी कार्यालय ते महापालिका मुख्यालय येथे अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी चपला झिजवूनही फेरीवाले कायम आहे. उलट फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी व परिसराचा बकालपणा घालविण्यासाठी आम्ही भाजपावाले पाठपुरावा करतोय म्हणून मधल्या काळात आमच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. हे फेरीवाले गोवंडी-मानखुर्द भागातील असून येथील टपोरी मुलांकडून आमचा शोध घेतला जात होता. आमच्याबद्दल अपशब्द काढले जातात. या गुन्हेगारीला आम्ही घाबरत नाही. परंतु पालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोणतेही सहकार्य लाभत नाही. भाजपावाले पाठपुरावा करुनही फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असल्याने इतर पक्षातील लोकांकडून आम्ही टिंगलटवाळीचा विषय बनलो आहोत, हे आम्हाला खेदाने नमूद करावे लागत आहे. महापालिका रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना सहकार्य करताना स्थानिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष देत नाही. आपण पालिकेवाल्यांना व आम्हाला समोरासमोर बोलवावे. आम्ही सानपाडातील नागरिकांसाठी करत असलेला पाठपुरावा व महापालिका प्रशासनाने आजवर स्थानिक भागातील भाजपाच्या समस्या निवारणासाठी केलेल्या पाठपुराव्याला, भेटीगाठी कशाप्रकारे केराची टोपली दाखवून फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला कशा प्रकारे सहकार्य करत आहे, खतपाणी घालत आहे, हे दाखवून देऊ. समस्या गंभीर आहे. फेरीवाल्यांचा सानपाडामधील नागरिकांना स्टेशनमध्ये जाण्यासाठी व स्टेशनबाहेर येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाला या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कायमस्वरुपी कारवाई करण्याचे कडक शब्दांमध्ये निर्देश द्यावेत व त्यांनी केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल मागवून घेण्याची मागणी पांडूरंग आमले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.



