अनंतकुमार गवई
नवी मुंबई : प्रभाग ८४ मध्ये वाढत्या चोरीच्या घटना व कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न तसेच रहीवाशांमध्ये निर्माण झालेली, भीती, असुरक्षिततेची भावना पाहता परिसरात तात्काळ पोलीस बीट चौकी उभारण्याची व पोलिसांची पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी भाजपाच्या युवती मोर्चाच्या नवी मुंबई अध्यक्षा सौ. सुहासिनी नायडू यांनी केली आहे.
नेरूळ वार्ड क्रमांक ८४ मध्ये वाढत्या चोरीच्या घटना आणि नागरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुहासिनी नायडू व प्रभागातील स्थानिक भाजपा महिला कार्यकर्त्यांनी नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नाईकवाडे यांची भेट घेत परिसरातील चोऱ्यामुळे निर्माण झालेल्या समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. जनसामान्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने जुईनगर व नेरूळमध्ये विस्तारलेल्या प्रभाग ८४ मध्ये पोलिस बीट स्थापन करण्याची व पोलिस पेट्रोलिंग वाढवण्याची सुहासिनी नायडू यांनी चर्चेदरम्यान मागणी केली. गेल्या महिन्यातही नायडू यांनी याच समस्येवर स्थानिक नेरूळ पोलिस स्टेशनला लेखी निवेदन देत पोलिस बीट चौकी व पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली होती.
चर्च्रदरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक नाईकवाडे यांनी भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. चर्चेत सुहासिनी नायडू यांनी प्रभागात अलीकडे घडलेल्या चोरीच्या घटनांबाबत तपशीलवार माहिती दिली. तसेच याआधी झालेल्या चोरींच्या संदर्भातही सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळात सुहासिनी नायडू यांच्यासमवेत सुजाता होगाडे, माऊलीका पांचाल, हेमा पेरीपिल्ले, भाग्यश्री सकारिया, सुवर्णा, संतोष कर्केरा, सर्व पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.



